Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Pune › ‘सिक्रेट ऑपरेशन’मध्ये ‘उर्मट’ ‘घावले’

‘सिक्रेट ऑपरेशन’मध्ये ‘उर्मट’ ‘घावले’

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 12:21AMपुणे : विजय मोरे 

तक्रार दाखल करण्यास येणार्‍या नागरिकांना उर्मट वागणूक देणार्‍या उद्धट कर्मचार्‍याचा एका ‘सिक्रेट ऑपरेशन’द्वारेे पंचनामा करण्याची अफलातून मोहीम राबवून ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी 48 उद्धट आणि उर्मट पोलिस कर्मचार्‍यांना चांगलाच दणका दिला आहे. विशेष म्हणजे तक्रारदारांशी सौजन्यपूर्वक वागणार्‍या 67 कर्मचार्‍यांचा यथोचित सत्कार करून, त्यांना कुंटुंबीयांसह कामशेत येथील वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी सन्मानपूर्वक पाठविण्यात आले. मात्र सत्कारमूर्तींसाठी टाळ्या वाजविण्याकरता मुद्दामहून या उद्दाम कर्मचार्‍यांना बसवून पोलिस अधिक्षकांनी त्यांना आगळी वेगळी शिक्षाही दिली.

ग्रामीण पोलिस दलातील वर्दीची मस्ती असणारे अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. वर्दी घातली म्हणजे आपण आकाशातून आलो आहोत, या मस्तीत राहणार्‍या या कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे एकूणच पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन येणार्‍यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकदम तुच्छतेचा असतो. फिर्याद दाखल करण्यास आलेल्या सर्वसामान्यांशी उद्धट वागणे हा प्रकार सर्रास पाहावयास मिळतो. ‘खाकी’कडून न्याय मिळेल या अपेक्षेने येणार्‍यांच्या तक्रारीच दाखल न करणे, गुन्हे थेट ‘बर्किंग’ करणे तडजोडीची लालसा ठेवणे, तसेच उर्मटपणे वागणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच असल्यासारखे ते वागताना दिसतात.

अशा उर्मट आणि कामचुकार अधिकारी आणि कर्मचार्‍यांना धडा शिकविण्यासाठी पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी एक नामी ‘ऑपरेशन’ केले. यासाठी त्यांनी महाविद्यालयीन तरूण-तरूणींची 30 जणांची एक टीम तयार केली आणि गेल्या पंधरा दिवसात त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात तक्रारदार म्हणून जाण्यास सांगितले. गेल्या पंधरा दिवसात या टीमने जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यास भेट दिली व तेथील ‘ड्युटी अंमलदाराकडे’ तक्रार घेऊन गेले. त्यावेळी त्यांना 48 अंमलदारांनी अत्यंत तुच्छतेची व उर्मट वागणूक दिली. परंतु, 67 कर्मचार्‍यांनी मात्र अत्यंत सौजन्यपूर्वक त्यांच्या तक्रारींची शहानिशा केली व याबाबतचा अहवाल त्यांनी पोलिस अधिक्षकांना दिला. 

पोलिस अधिक्षकांनी हा अहवाल आल्यानंतर या उर्मटांना धडा शिकविण्यासाठी वेगळाच कार्यक्रम आखला. प्रथम त्या उर्मट कर्मचार्‍यांना कार्यालयीन नोटिस देवून शिक्षा ठोठावली. परंतु, त्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देणार्‍या त्या 67 जणांचा मुख्यालयात सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला व त्या कार्यक्रमास त्या 48 उर्मटांनाही उपस्थित राहण्यास सांगितले. कार्यक्रमात सत्कारमूर्ती सत्कार स्वीकारत असताना या उर्मट कर्मचार्‍यांना लज्जीत होऊन टाळ्या वाजवाव्या लागत होत्या.

अधीक्षक हक यांनी सत्कार समारंभानंतर सत्कारमूर्ती 67 पोलिस कर्मचार्‍यांना कुंटुंबीयांसह मुख्यालयात आमंत्रित केले व त्यांना एक दिवसाची सुट्टी देऊन कामशेत येथील ‘वेट अ‍ॅड जॉन’ या वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी पाठविले. पोलिस अधिक्षकांच्या या ‘सिक्रेट ऑपरेशन’मुळे जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांनी धसका घेतला असून, पोलिस दलात त्या उद्धट कर्मचार्‍यांचीच चर्चा सुरू आहे.

 

Tags : pune, pune news, Police Officer, Secret Operation,