Wed, Apr 24, 2019 21:56होमपेज › Pune › हृदय शस्त्रक्रियेसाठी पैसे नसलेल्या हतबल आई-वडिलांची आर्त हाक 

माझ्या पोरीला वाचवा हो...!

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

‘तिला’ सारखी धाप लागत होती. पण निदान काही सापडत नव्हतं.  त्यानंतर तपासणी केल्यावर आभाळचं कोसळलं. कारणही तसचं होतं. तिची हृदय शस्त्रक्रिया करावी लागणार होती. अनेकांकडे आर्थिक सहाय्यासाठी उंबरठे झिजवले, पण पदरात काहीचं पडल नाही. आता तर तिच्याकडे अवघे काहीच दिवस उरले असून ‘ती’ आम्हाला कायमची सोडून निघून जाईल..! शस्त्रक्रिया दूरच, पण तपासण्यांसाठीही पैसे नाहीत, काय करायचं? कोणीतरी तिला वाचवा हो...गरिबीनं हात-पाय करकचून बांधलेले तिचे आई-वडील आर्त हाक देत आहे.  पल्‍लवी ऊर्फ राणी रोहिदास खरे (17 रा. महादेव कॉलनी, गंगानगर, हडपसर) असे या युवतीचे नाव आहे. 

दहा बाय दहाच्या खोलीत पल्‍लवी आई -वडील, भावडांसमवेत राहते. आई घरकाम तर वडील वायरिंगचे काम करून महिन्याकाठी मिळणार्‍या सात ते आठ हजार रुपयांमध्ये संसाराचा गाडा ढकलतात. चार वर्षांपूर्वीच म्हणजे पल्लवी 13 वर्षांची असताना तिला सारखी धाप लागत होती. त्यानंतर पैशाची उलाढाल करून तपासणी केली. त्यामध्ये पल्‍लवीच्या हृदयाचा व्हॉल्व्ह लहान असल्याने तिच्या शरीराला हवा तेवढा रक्‍तपुरवठा होत नाही. या मुळे तिला धाप लागते व कायम सर्दी खोकला होतो.  

त्यासाठी व्हॉल्व्ह बदलणे (रिप्लेसमेट) ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून त्यासाठी तीन ते चार लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. असेच चार वर्षे पुढे सरकली. तिचा त्रास वाढू लागल्याने तिच्या मदतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हृदय शस्त्रक्रिया झालेली वैशाली धावून आली आहे. वैशालीचे काका प्रताप यादव व मित्रमंडळींनी त्यांना पाठबळ देत तिची या मे महिन्यात ‘टूडी इको’ तपासणी करून घेतली. मात्र, त्यानंतर आता तिच्या शस्त्रक्रियेचा खर्च सहा लाखांवर गेला आहे. ही रक्कम दुप्पट झाली आहे. आर्थिक सहाय्यतेसाठी अनेकांकडे हेलपाटे मारले परंतु पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेले खरे कुटुंबीय आपल्या मुलीच्या काळजीत पडले आहेत. 

आरोग्य यंत्रणेची उदासीनता

राज्यातील शून्य ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आजारांचे निदान होऊन त्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ (आरबीएसके) हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. या पथकातील डॉक्टरांनी पल्‍लवीचीही तपासणी ती शिकत असलेल्या दत्‍तात्रय कलावती शाळेत केली. पण, त्यांना सर्व सांगूनही तेथील डॉक्टरांनी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचे घरच्यांनी सांगितले.

शून्य ते 18वयोगटातील विद्यार्थ्यांना काही आजार असेल तर त्याची नोंद संबंधित ठिकाणाच्या आरबीएसके डॉक्टरांकडे होते. तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांतून त्यावर उपचार केले जातात. मात्र, पल्‍लवीविषयी काही माहिती नसल्याने त्याबाबत अधिक चौकशी करण्यात येईल.  -डॉ. बी. नंदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे.