Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Pune › देहूरोड-निगडीदरम्यान महामार्गावर ठिकठिकाणी लक्षवेधी निसर्गचित्रे 

सुशोभित महामार्गामुळे यंदा पालखीचा मार्ग सुखद

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:05AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

वारीत सहभागी वारकर्‍यांची भक्ती... आणि सीमेवर लढणार्‍या लष्कराची शक्ती... देहूरोडच्या अंतरंगांचे दर्शन घडविणारी अशी अनेक चित्रे पुणे-मुंबई  महामार्गावर देहूरोड ते निगडीदरम्यान नव्याने चौपदरीकरण झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रस्त्याचे काम 95 टक्क्यांहून अधिक झाले असून, शेवटच्या टप्प्यातील किरकोळ कामे पूर्ण करण्याची लगबग युद्धपातळीवर सुरू आहे. एकंदरीतच महामार्गाचे हे बदलेले रूप यंदा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना मनोमन सुखावणारे ठरणार आहे.

नव्या सहस्रकाच्या सुरुवातीच्या काळात पुणे-मुंबई महामार्गाचे निगडी ते शिळफाटा हे सुमारे 93 किलोमीटर अंतरातील चौपदरीकरण झाले आणि देशातील सर्वाधिक वर्दळीच्या या राष्ट्रीय महामार्गाने सुटकेचा निःश्‍वास घेतला. पण या कामातून देहूरोड-निगडी हा 6.3 किलोमीटरचा टप्पा दुर्लक्षित राहिला. त्यामुळे या भागातील वाहतुकीला सतत ब्रेक लागत असे. वाहतुककोंडीची समस्या तर येथील नित्याची बाब झाली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजीत पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही या वाहतुक कोंडीचा अनुभव घेतला होता. या टप्प्यातील चौपदरीकरणासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी तब्बल चौदा वर्षे अक्षरशः रान उठवले होते. 

जनतेच्या रेट्यामुळे वारंवार चौपदरीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात आलेही, पण लाल फितीच्या कारभारामुळे ते पूर्णत्वास जऊ शकले नाहीत. अखेर 2015 मध्ये या कामाला मुहूर्त मिळाला आणि 2017 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. आता हे काम 95 टक्क्यांहुन अधिक पूर्ण झाले आहे. शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना ते निगडी या भागात रात्री लखलखीत चंदेरी प्रकाशाने महामार्ग उजळून निघाला आहे. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे. मुरूमाच्या साह्याने साईडपट्ट्या भरण्यात आल्या आहेत. प्रशस्त आणि गुळगुळीत (विशेषतः खड्डेमुक्त) रस्त्यामुळे प्रवास अतिशय सुखावह झाला आहे. या महामार्गावरील ठिकठिकाणचे नाले, ओढे यावर मोर्‍या व छोटे पूल बनविण्यात आले आहेत. या मोर्‍यांच्या कठड्यावर निसर्ग संवर्धनाचा संदेश देणार्‍या चित्रांसह देहू, देहूरोडचे अंतररंग उलगडून दाखविणारी मनमोहक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. एकंदरीतच महामार्गाचा हा टप्पा यंदाच्या पालखी सोहळ्याचा पहिल्या मुक्कामाचा प्रवास नक्कीच सुखकारक करणारा ठरेल.