Sun, Jul 21, 2019 10:22होमपेज › Pune › पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान

पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान

Published On: Jul 10 2018 1:29AM | Last Updated: Jul 10 2018 1:17AMपुणे/फुरसुंगी : प्रतिनिधी

जाता पंढरीसी ! सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची..!

अशा प्रकारचे अभंग म्हणत  संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली व तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर सोमवारी (दि. 09) सकाळी सहा वाजता मार्गक्रमण केले.  माउली माउलीनामाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात दोन्ही  पालख्यांना पुणेकरांनी उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला. त्यात सकाळी 10 वाजेनंतर रिमझिम पावसाने सोबत केल्याने  वारकर्‍यांचा आनंद व्दिगुणित झाला होता. सायंकाळी 9 वाजता माउलींची पालखी सासवडला तर तुकोबांची पालखी रात्री लोणीकाळभोरनगरीत विसावली. 

ज्ञानेश्वर माउली पादुकांची नाना पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात पहाटे विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्याने सासवडकडे मार्गक्रमण केले. वानवडी आणि हडपसर परिसरात काही वेळ विसावा घेतला. या ठिकाणी पादुका दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. रंगीबेरंगी फुलांनी सजविलेला रथ, त्यापुढे ऐटबाज अश्‍व आणि नामाचा जयघोष करत पालखी पुढे सरकत होती. दिवे घाटातील अवघड वळण पार करण्यासाठी माउलींच्या पालखी रथाला पाच बैलजोड्या लावल्या होत्या. 

जगद‍्गुरू तुकोबारायांच्या पालखीने सकाळी सातच्या सुमारास भवानी पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरातून लोणी-काळभोरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी वारकरी आणि नागरिकांनी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. दुपारचा विसावा घेतल्यानंतर पालखी सोहळा लोणी-काळभोरच्या दिशेने मार्गस्थ झाला.फुरसुंगी, भेकराईनगरमध्ये स्वागत सकाळी पुण्याहून निघालेल्या ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे भेकराईनगर येथे फुरसुंंगी ग्रामस्थांनी  स्वागत केले. यावेळी संपूर्ण परिसर विठुनामाच्या गजराने भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.   भेकराईनगर कमानीजवळ फुरसुंगी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. 

फुरसुंगी उड्डाण पुलाजवळही (पॉवर हाऊस) भाविकांनी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. पालखी मंतरवाडी परिसरात आल्यानंतर वरुणराजानेही स्वागत केले.  त्यामुळे वारकर्‍यांचा उत्साह आणखी वाढला. दुपारी साडेबाराच्या सुमारास उरुळी देवाची फाट्यावर माउलींच्या पालखीचे आगमन झाले. या वेळी उरुळी देवाचीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.

पहिला विसावा उरुळी देवाचीला  घेतला. येथील विसाव्यादरम्यान अनेक वारकर्‍यांनी आजूबाजूला जागा मिळेल त्या ठिकाणी न्याहारी घेतली. येथील पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर पालखीने वडकीच्या दिशेने प्रस्थान ठेवले.दहावा मैल (वडकी) या ठिकाणीही पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. वडकीनाला या ठिकाणी पालखी दुपारी अडीचच्या दरम्यान पोहोचली. या ठिकाणी वडकी ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. येथील पाऊण तासाच्या विश्रांतीनंतर माउलींच्या रथाने मानाच्या बैलजोडीसह दिवे घाट चढणीला सुरुवात केली. पालखीच्या आगमनामुळे सकाळपासूनच हडपसर-वडकीनाला या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. 

सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी मार्गावर ठिकठिकाणी विविध गणेश मंडळे, हिंदवी उद्योगसमूह, लोककल्याण प्रतिष्ठान, भ्रष्टाचार निमूर्लन जनसंघटना, परशुराम जाधव पतसंस्था, शांताई प्रतिष्ठान यासारख्या संस्था, कार्यकर्ते, सेवेकरी संस्थांनी सेवा केली.