Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Pune › शिवसृष्टीतील शिल्पांची रंगरंगोटी

शिवसृष्टीतील शिल्पांची रंगरंगोटी

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:28AMभोसरी : वार्ताहर

महापालिकेच्या वतीने भोसरी येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीची पालिका प्रशासनाच्या उदासीनतामुळे दुरवस्था झाली होती. ‘भोसरीतील शिवसृष्टीकडे पालिकेचे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच झोपी गेलेले प्रशासन खडबडून जगे झाले. शिवसृष्टीतील शिल्पांची रंगरंगोटी करण्यात आली. तसेच परिसरातील साफसफाई व डागडुजीचे काम हाती घेण्यात आले.  शिवजयंतीच्या अगोदर पालिकेने दाखविलेल्या तत्परतेबद्दल शिवप्रेमी व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ‘पुढारी’ने  या प्रश्‍नाला वाचा फोडल्याने नागरिकांनी आभार मानले.

भोसरी येथील शिवसृष्टीतील अनेक शिल्पांचे रंग उडाले होते. ठिकठिकाणी पक्षांची विष्ठा शिल्पावर पडलेली होती. अनेक दिवस शिवसृष्टी न धुतल्याने सर्व शिल्पावर ठिकठिकाणी धूळ साचलेली होती. शिवसृष्टीत  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील, बाळ शिवाजी जन्म सोहळ्यापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे पंचवीस महत्वाचे प्रसंग आकर्षकरित्या शिल्पामध्ये उभारण्यात आले आहेत.पालिकेने दुर्लक्ष केल्याने परिसराचे विद्रुपीकरण झाले होते

शिवसृष्टी परिसरातील अनेक ठिकाणच्या फरश्या उखडलेल्या स्थितीत होत्या. त्याची देखील डागडुजी करण्यात आली आहे. छतावर गवतांची वाढलेली झुडपे काढण्यात आली आहेत. परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने जागोजागी कचरा साठलेला होता.तो देखील उचलण्यात आला आहे. ठिकठिकाणचे बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करून सुरु करण्यात आले आहेत. पुढारीच्या वृताची दखल घेत महापालिकेने शिवसृष्टी परिसरात रंगरंगोटी व डागडुजी केल्याने शिवप्रेमींनी   समाधान व्यक्त केले आहे.