Sun, Nov 17, 2019 12:22होमपेज › Pune › ‘मॅट नर्सरी’द्वारे भात शेती; उत्पादनात वाढ

‘मॅट नर्सरी’द्वारे भात शेती; उत्पादनात वाढ

Published On: Jul 12 2019 2:07AM | Last Updated: Jul 12 2019 1:58AM
पुणे : नरेंद्र साठे
मावळातील बेलज गावातील रवींद्र गायकवाड यांनी भात शेतीसाठी दोन वर्षांपासून यांत्रिकी पद्धत अवलंबली आहे. सलग दुसर्‍या वर्षी त्यांनी भाताचे रोप मॅट नर्सरीत तयार केले. गायकवाड यांच्यासारख्या अनेक शेतकर्‍यांकडून यंत्राच्या साहाय्याने भातलागवडीची लगबग सुरू आहे. पारंपरिक शेतीद्वारे भाताचे सरासरी एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते, तर यांत्रिकीकरणाद्वारे सरासरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन मिळते. तालुकानिहाय हे प्रमाण कमी-जास्तदेखील होते. 

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून भात शेतीमध्ये सुधारणा होण्यासाठी आणि सध्याच्या काळात शेतकर्‍यांना परवडणारी शेती होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पारंपरिक भात शेतीवरून शेतकर्‍यांना यांत्रिकीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. यासाठी काही शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला आहे. मावळात शंभर एकर यांत्रिकी पद्धतीने भाताचे पीक लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याने शेतकर्‍यांनी मॅट नर्सरीवर रोपे तयार करण्यावर या वर्षी भर दिला आहे. जिल्ह्यात तीनशे एकरांवर यांत्रिकीकरणाद्वारे भातलागवड करण्याचे या वर्षीचे उद्दिष्ट आहे. याबाबत शेतकरी रवींद्र गायकवाड म्हणाले, मजुरांकडून दोन एकरांत भातलागवड करण्यासाठी वीस हजार खर्च येत होता. मशिनने लागवड केल्याने केवळ सहा ते सात हजार खर्च आला. याशिवाय दोन एकरांच्या लागवडीसाठी नर्सरीमध्ये केवळ 24 किलो बियाणे लागले असून, बियाणाचीदेखील बचत होते. गतवर्षी वडेश्‍वर येथील मधू जांभळे यांनी घराचे बांधकाम सुरू असताना टेरेसवर भाताची नर्सरी तयार केली होती, तर काही शेतकर्‍यांनी पोल्ट्रीमध्ये नर्सरी तयार केली होती.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून खरीप हंगाम आढावा बैठका घेण्यात येत आहे. यामध्ये भात पिके घेणार्‍या तालुक्यांचा पहिल्यांदा समावेश करून सध्या बैठका सुरू आहेत. यांत्रिकीकरणाचे जिल्ह्यात तीनशे एकरांचे उद्दिष्ट आहे. 

यंत्राद्वारे लागवड करताना काळजी घ्यावी

लागवडीसाठी शेती तयार करताना पॉवर टिलरने चिखलणी करावी लागते. म्हणजे 10 ते 15 सेंमी खोल चिखल तयार होतो. लागवडीपूर्वी एक दिवस चिखलणी करावी लागते. रोपांची वाहतूक करताना ‘बेड केक’ तुटणार नाही, हेही बघावे लागते. 

शेतकर्‍यांना प्रशिक्षणासह अनुदान

भात शेती लागवड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी दोन वेळा प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये एकदा यांत्रिकीकरणाची ओळख आणि दुसर्‍यांदा फिल्डवर ‘मॅट नर्सरी’चे प्रशिक्षण दिले जाते. याद्वारे यांत्रिकीकरण भात शेती करणार्‍या शेतकर्‍यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेद्वारे चार हजारांचे अनुदान देण्यात येते.