Thu, Feb 21, 2019 01:23होमपेज › Pune › पुणे :  पालिकेसमोरील नो-पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई 

पुणे :  पालिकेसमोरील नो-पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई 

Published On: Jul 06 2018 1:29PM | Last Updated: Jul 06 2018 1:29PM
पुणे : प्रतिनिधी

 पुणे  महापालिका परिसरातील नो-पार्कींग झोनमध्ये लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर कारवाई करण्याची मोहिम  वाहतूक पोलिसांकडून आज,  शुक्रवारी  सकाळपासून हाती घेतली आहे.  ई-चलनसाठी वाहतूक पोलिस गाड्यांचे नंबर मशिनमध्ये नोंदवत असल्याचे व गाड्यांचे फोटो काढत असल्याचे दिसताच, अनेकांनी आपल्या गाड्या इतर ठिकाणी हालवल्या. त्यामुळे काही वेळातच पालिका भवनसमोरील परिसर मोकळा झाला. आत्ता ही कारवाई किती काळ चालते, की  दबावापोटी थांबते, हे पहावे लागणार आहे.

 नो - पार्कींग  झोनमध्‍येच पार्कींग

महापालिका परिसरात पीएमपी बस स्थानकांची व्यवस्था करण्यात आल्याने या परिसरातून ये-जा करणार्‍या बसची संख्या मोठी आहे. त्यामुळे पालिका परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने पालिकेसमोरील परिसरातील रस्त्यांवर नो - पार्कींग झोन केला आहे. विविध कामे करण्यासाठी पालिकेत येणार्‍यां नागरिकांसाठी आणि माननियांच्या गाड्यांसाठी महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणात वहान तळांची व्यवस्था आहे.  मात्र, पालिकेचा वाढता विस्तार आणि कामामुळे पालिकेत येणार्‍यांची संख्या वाढल्याने पालिका परिसरात नो-पार्कींग असलेल्या ठिकाणीच बेकायदेशीरपणे गाड्या पार्कींग केल्या जातात. 

वाहनांची होतेय वाहतूक कोंडी

पालिका भवनासमोरील रस्त्यांवर दोन्ही बाजून आणि रस्त्याच्या मध्यभागी चारचाकी आणि दुचाकी गाड्या पार्कींग केल्या जातात. या ठिकाणी नगरसेवकांसह प्रशासनाच्याही गाड्या अस्ताव्यस्त स्वरुपात लावलेल्या असतात. याशिवाय इमारतीच्या पश्‍चिमेकडील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी दुचाकी लावल्या जातात. परिणामी या रस्त्यावरून जाणार्‍या पीएमपी बस आणि इतर वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

 दैनिक पुढारी इफेक्‍ट

पालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उद्घघाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते २१ जून रोजी झाल्यानंतर पालिका परिसरात नो पार्कींगमध्ये लावलेल्या दुचाकी व चारचाकींवर मोठा पोलिस बंदोबस्त लावून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिवाजीनगर वाहतूक शाखेने दिले होते. उपराष्ट्रपतींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जागोजागी नो - पार्कींगचे फलक रावण्यात आले आहेत. हा दौरा संपून पंधरा दिवस उलटत आले तरी वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याचा मुहुर्त सापडत नव्हता. यासंदर्भातील वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर आज,  शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी  नो - पार्कींग झोनमधील पालिकेच्या समोरील चारचाकी आणि दुचाकी गाड्यांवर कारवाईची मोहिम हाती घेतली.

काही वेळातच पालिका भवनसमोरूल परिसर मोकळा 

 वाहतूक पोलिसांनी या गाड्यांचे ई चलन केले असून संबंधीत गाडी मालकास दंडाचा मेसेज पोहचला आहे. यापुढे नो - पार्कींगमध्ये लावलेल्या गाड्यांना जामर लावण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिवाजीनगर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश गायकवाड यांनी सांगितले आहे.  ई-चलनसाठी वाहतूक पोलिस गाड्यांचे नंबर मशिनमध्ये नोंदवत असल्याचे व गाड्यांचे फोटो काढत असल्याचे दिसताच, अनेकांनी आपल्या गाड्या इतर ठिकाणी हालवल्या. त्यामुळे काही वेळातच पालिका भवनसमोरूल परिसर मोकळा झाला. आत्ता ही कारवाई किती काळ चालते, की माननियांच्‍या दबावापोटी थांबते, हे पहावे लागणार आहे.