Sat, Apr 20, 2019 08:06होमपेज › Pune › पीएमआरडीए करणार ६५०० घरांची निर्मिती

पीएमआरडीए करणार ६५०० घरांची निर्मिती

Published On: Apr 16 2018 1:12AM | Last Updated: Apr 16 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे, जो खासगी-भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 6 हजार 415 घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी सात कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातील 382 शहरांमध्ये आणि 832 गावांमध्ये ही योजना राबविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. जानेवारी 2018 मध्ये राज्य सरकारने शहरी भागात खासगी आणि भागीदारी तत्त्वावर ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. तर शहरासाठी डिसेंबर 2017 पासून ही योजना लागू झाली. ‘पीएमआरडीए’अंतर्गत सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेला 13 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. ‘पीएमआरडीए’ने निविदा शुक्रवारी (दि.13) दुपारी तीन वाजता उघडली. निविदांचे मुल्यांकन आणि गुणांकन करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यापैकी दोन सदस्य हे म्हाडा तर तीन सदस्य ‘पीएमआरडीए’चे आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम निविदा प्रक्रियेत सात कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेसाठी पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घरकुल म्हाडाने ठरवलेल्या किंमतीत जी कंपनी उत्सूक असेल आणि जमीन ‘आरएफपी’मध्ये दिलेल्या नियमात असेल तरच त्या कंपनीचा प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेसाठी प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. या निविदा प्रक्रियेमध्ये निवड होणार्‍या निविदाधारकाला शासनाकडून अडीच एफएसआय मिळणार आहे. सार्वजनिक जमिनीवर राबविण्यात येणार्‍या पीपीपीच्या अंतर्गत राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय यंत्रणा यांच्या जमिनीवर खाजगी विकसकांच्या सहभागातून परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. 

Tags : PMRDA, produce, 6,500 houses,