Sun, Mar 24, 2019 23:59
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पीएमआरडीएचे लवकरच अर्धा टीएमसीचे 2 प्रकल्प

पीएमआरडीएचे लवकरच अर्धा टीएमसीचे 2 प्रकल्प

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 12:18AMपुणे : प्रतिनिधी

नवीन पुण्याच्या विकासासाठी हवेली तालुक्यातील वाघोली आणि मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे प्रायोगिक तत्त्वावर (0. 5) म्हणजे प्रत्येकी अर्धा टीएमसी पाण्याचे प्रकल्प (पुनर्वापर) उभारण्यात येणार आहेत. या पाण्यातून परिसरात झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येसाठी आणि इतर सोयीसुविधांसाठी या पाण्याचा उपयोग करण्यात येणार  असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिली.पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन होऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीएमआरडीएने मागील तीन वर्षांत केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.  याप्रसंगी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे तसेच अतिरिक्‍त मुख्य अधिकारी दिनेश डोके, वडाचीवाडीचे सरपंच दत्रात्रय बांदल आणि होळकरवाडीच्या सरपंच मंगलताई झांबरे उपस्थित होते.

बापट म्हणाले, की पीएमआरडीए बाळसं धरत आहे. या तीन वर्षांत अनेक दीर्घकालीन कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांसाठी लागणारा निधी, मान्यता, नाागरिकांचे प्रश्न, त्यांची सोडवणूक, यासाठी बराच कालावधी जाणार आहे. पुणे महानगर प्राधिकरण क्षेत्राची लोकसंख्या 74 लाख आहे. प्राधिकरण क्षेत्रात एकूण 16 धरणे आहेत. त्यांची साठवण क्षमता 109.24 टीएमसी इतकी आहे. यातील पाणी सिंचनसाठी 64.75 टीएमसी आरक्षित ठेवावे लागते. तर घरगुती वापरासाठी 30.23 टीएमसी इतके पाणी लागते. याच बरोबर औद्योगिक वापरासाठी 4.63 टीएमसी इतका पाणीसाठा लागत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपाकिलांची लोकसंख्या वगळता 25 लाख लोकसंख्या पीएमआरडीएमध्ये आहे. याकरिता तब्बल 15.18 टीएमसी पाण्याची गरज आहे. यामुळे वाघोली आणि पिंरगुटमध्ये पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.  

पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी पीएमआरडीएकडून पाण्याचा आराखडा तयार करण्याचे देखील काम सुरु करण्यात आले आहे. गळती होणारे पाणी वाचवून त्याचा वापर पीएमआरडीएकरिता कशाप्रकारे करता येईल. नव्या पुण्याची विमानातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचे तसे नकाशे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक रस्ते, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, शाळा, पाणी, ड्रेनेजलाईन आदींच्या यामध्ये अंतर्भाव केला केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ते सर्व पीएमआरडीएच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.   

शिवाजीनगर येथे मेट्रो स्टेशनसाठी गोदामाच्या जागेची नुकतीच मी पाहणी केली आहे. लवकरच जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी काम सुरू केले जाणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. त्याचबरोबर महामेट्रोतर्फे होणार्‍या वनाज-स्वारगेट-निगडी आणि वनाज-शिवाजीनगर-रामवाडी (चंदननगर) या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे, असेही  त्यांनी सांगितले. 

पीएमआरडीएचे महत्वकांक्षी प्रकल्प 

हायपरलूप 

हायपरलूप म्हणजे प्रवासी व मालवाहतूकीसाठी अतिशय वेगाने सुरक्षित आणि अत्याधुनिक वाहतुकीची व्यवस्था. हायपूरलूप तंत्रज्ञानाच्या साह्याने हवेच्या पोकळीतून स्पीडबे्रकरशिवाय मेट्रोसारख्या ट्रेनमधून प्रवास करणे शक्य होते. त्यासाठी विशिष्ट आकार आणि स्वरुपाच्या टयूबची निर्मिती करण्यात येत आहे. त्यातील हायपरलूप वाहक डबे कॅप्सूलसारखे असतात. चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या रुळांवरुन हायपरलूप वाहक धावतात. पीएमआरडीएने व्हर्जिन हायपरलूप या कंपनीबरोबर 2017 मध्ये सामंजस्य करार केला. व्हर्जिन हायपलूप ही कंपनी वेळ अंतर या मर्यादांच्या पलीकडे जाऊन वेगवान वाहतूक सेवा आणि प्रचंड अर्थिक संधी निर्माण करण्याच्या ध्येयानं काम करत आहे. 

रिंगरोड

पुणे आणि महानगरीय प्रदेशातील महत्वाच्या भागांना जोडणार्‍या 128 किलोमीटर रिंगरोडचं नियोजन पीएमआरडीएनं केले आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण होणार असून, राज्य सरकारनं या संपूर्ण प्रकल्पाची महत्वकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्प म्हणून घोषणा केली आहे. या रिंगरोडच्या निर्मिती आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्यासाठी मल्टिलॅटरल, बायलॅटरल संस्थांना कर्जप्रस्ताव देण्यात आला आहे. रिंगरोड प्रकल्पातंर्गत सातारा रोड ते नगररोड या पहिल्या टप्यासाठी यापूर्वीच 2,468 कोटी रुपये केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिले आहेत. 

म्हाळुंगे माण टाऊनशीप 

पीएमआरडीए मॉडेल टाऊनशिप म्हांळुगे माणमध्ये विकसित करत आहे. 128 किमी रिंगरोडवरील एकूण 41 टाऊनशीपपैकी म्हाळुंगे माण ही एक टाऊनशीप आहे. ही टाऊनशीप 250 हेक्टरवर विस्तारलेली असेल. या टाऊनशीपमध्ये जवळपास 1.5 लाख लोकांना राहण्यासाठी घरं निर्माण केली जातील. हिंजवडी आयटी पार्कपासून जवळच असलेल्या या टाऊनशीपमधील रस्ते 18 ते 36 मीटर रुंद असतील. या प्रकल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे जमीन मालकानाच प्रकल्पामध्ये भागधारक करुन घेतलं जाणार आहे. 

पाणीपुरवठा 

पुणे महानगर प्रदेशाला निसर्ग संपन्नतेचं वरदान लाभलं आहे. पश्‍चिमेला असलेला खडा सहयाद्री आणि या डोगरांतून उगम पावणार्‍या नद्या येथे आहेत. सहयाद्री डोंगररांगामध्ये निसर्ग संपन्न वातावरण नेत्रसुखद सौदर्यांचा अनुभव देणारी अनेक हिल स्टेशन आणि रिसॉर्टस आहेत. पुणे महानगर प्रदेशातील सोळा मोठी धरणं आणि तलाव आहेत. त्याव्दारे एकूण 100 टीएमसी पाणीसाठा होतो. वेगाने होणारं शहरीकरण आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी डोळ्यासमोर ठेवून सरकारने 30 टीएमसी पाणी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी राखीव ठेवला आहे. पुणे महानगर प्रदेशाची लोकसंख्या अंदाजे 25 लाख आहे. पुढील दोन दशकांत जवळपास 30 लाख लोक स्थलांतरित होण्याची क्षमता आहे. म्हणूनच पीएमआरडीएन पाण्याचे स्त्रोत वाढवणे आणि पाण्याचे योग्यरितीने वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यांच्या पूर्वला असलेल्या वाघोलीसह पिंरगुट आणि परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्याचे ठरवले आहे. 

 

Tags : pune, pune news, PMRDA, TMC projects,