Sat, May 25, 2019 23:07होमपेज › Pune › ‘सरबाणा जुराँग’ कंपनी तयार करणार ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा

पुण्याचे सिंगापूर !

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) सिंगापूर येथील ‘सरबाणा जुराँग’ कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे पुण्याचा विकास सिंगापूरच्या धर्तीवर होऊ शकेल. त्यासाठी महाराष्ट्र आणि सिंगापूर सरकारमध्ये बुधवारी करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योगमंत्री एस. ईश्‍वरन यांनी संयुक्त करारनाम्यावर स्वाक्षरी केली. 

पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, उद्योग आणि यामुळे वाढणार्‍या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे होते. पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार्‍या विकास आराखड्यामध्ये अनेक प्रकारच्या उणिवा जाणवत होत्या. त्यामुळे पुढील पन्नास वर्षांसाठीचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी पीएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या महानगरांच्या विकास आराखड्यांनुसार पीएमआरडीएच्या विकास आरखड्याचे काम सिंगापूर येथील अनुभवी ‘सरबाणा जुराँग’ कंपनीकडे देण्याचा निर्णय बुधवारी सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत घेतला. विकास आराखड्याच्या पूर्व अनुभवांचा फायदा पुण्याच्या विकास आराखड्यासाठी व्हावा, अशा सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. 

या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार व सिंगापूर सरकारच्या सचिवांची पुणे महानगर प्राधिकरणाच्या आयुक्तांसह समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सखोलपणे अभ्यास करून आपला अहवाल एप्रिलमध्ये सादर केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की महाराष्ट्र आणि सिंगापूर सरकारमधील करार, हा ऐतिहासिक क्षण आहे. मी व्यक्तिशः सिंगापूर सरकारच्या कार्यपद्धतीने प्रभावीत झालो आहे. पुढील तीस ते चाळीस वर्षे ही भूमिका पुणे शहर निभावणार आहे. याकरिता पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ‘सरबाणा जुरॉग’ कंपनीस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते, सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त लिम थ्वॉन क्वॉन, सिंगापूर सरकारचे प्रतिनिधी डॉ. फ्रान्सिस च्वॉन उपस्थित होते.

परवडणार्‍या घरांची योजना

सिंगापूर हा छोटा देश आहे. आम्ही फार कमी देशांबरोबर काम करतो. महाराष्ट्र व सिंगापूर शासनामध्ये पारदर्शकतेचे साधर्म्य आहे. मोठ्या शहरांचा विकास करण्याचा अनुभव दोन्ही शासनांना आहे. पुणे महानगर विकास आराखड्याबरोबरच पुढील काळात विमानतळासह परवडणार्‍या घरांसाठीदेखील एकत्र काम करू, असे सिंगापूरचे मंत्री ईश्‍वरन यांनी सांगितले.

आराखडा दोन वर्षांत

विकास आराखड्यात रिंगरोड, मेट्रोचे जाळे, पुणे शहर ते पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्याचे नियोजन, कचरा प्रश्‍न, समान पाणीवाटप, टाउनशिपच्या माध्यमातून परवडणार्‍या घरांची निर्मिती, पयर्टन विकास, रोजगारनिर्मितीसाठी नवीन औद्योगिक केंद्रांच्या निर्मितीचा समावेश केला जाणार आहे. या आराखड्याचा मसुदा दहा महिन्यांत तयार करण्यात येणार आहे, तर पूर्ण आराखडा दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल.  - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए.