Thu, Apr 25, 2019 06:07होमपेज › Pune › चलती का नाम ‘पीएमपीएमएल’

चलती का नाम ‘पीएमपीएमएल’

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:32AMपुणे : नवनाथ शिंदे

बसेसचे ब्रेकडाऊन 30 हजारांवर, जादा रकमेच्या निविदेमुळे चक्क बसेसमधील फायर अ‍ॅण्ड सेफ्टी ऑडिट रेंगाळले, देखभाल दुरुस्तीअभावी प्रवाशांचा असुरक्षित प्रवास, गळक्या आणि 422 स्क्रॅप बसेसचा भरणा, ठेकेदारांच्या ताब्यातील बस अपघाताची मालिका कायम, इंधन दरवाढीमुळे दर महिन्याला दोन लाखांचा अतिरिक्त बोजा, ठेकेदारांकडून महामंडळाच्या आदेशाला केराची टोपली अशा विविध घटनांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) आर्थिक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचा टॉप गिअर नक्की कशामध्ये गुंतला आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

शहरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेतलेल्या पीएमपीएमएल महामंडळाला ब्रेकडाऊन, इंधनदरवाढ, देखभाल दुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. महामंडळाच्या ताब्यातील 1 हजार 444 बसेसपैकी दरदिवशी 350 ते 450 बसेस विविध कारणांमुळे बंद राहात आहेत.  तर ठेकेदारांच्या ताब्यातील 653 बसेसपैकी 150 ते 200 बसेस चालविल्या जात नाहीत. तसेच महामंडळाकडून तब्बल 422 स्क्रॅप बसेसद्वारे प्रवाशांची असुरक्षित ने-आण केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. काही बसेसच्या देखभाल दुरुस्तीअभावी व गळक्या छप्परामुळे महामंडळाचा कागदोपत्री दुरुस्तीपणा उघडा पडला आहे.  वायफर, बे्रक, इंडिकेटर, हॉर्न नादुरुस्त असल्याने बस सेवेला अवकळा आली आहे.

तर दुसरीकडे ठेकेदारांच्या ताब्यातील बसेसचा एकाच महिन्यात दोन वेळा अपघात झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांवरील किरकोळ दंडात्मक कारवाई करून प्रवाशांच्या जिवाशी खेळले जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. तांत्रिक अडचणींमुळे बसेसमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामध्ये 10 ते 12 बसेस जळाल्या होत्या, त्या पार्श्‍वभूमीवर सर्वच बसेसचे फायर अ‍ॅण्ड सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात 50 बसेसचे ऑडिट करून जादा रकमेच्या निविदेचे कारण देत ऑडिट रेंगाळत ठेवण्यात आले. इंधन दरवाढीमुळे महामंडळाला दर महिन्याला तीन ते चार लाखांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे चर्चेत राहणार्‍या महामंडळाचा टॉप गिअर पडणार कधी, असा प्रश्‍न संघटनांनी विचारला आहे.

पीएमपीएमएल महामंडळात एसटीचे निवृत्त अधिकारी

एसटी प्रशासनातून निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांच्या अनुभवाचा फायदा पीएमपीएमएलला होण्यासाठी चार विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली होती. प्रत्यक्षात एसटी आणि पीएमपीएमएल प्रवासामध्ये फरक असल्यामुळे अधिकार्‍यांना वर्षपूर्ती झाली तरी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यास त्यांना अपयश आल्याचे बोलले जात आहे.