Tue, Mar 26, 2019 21:54होमपेज › Pune › ‘पीएमपीएमएल’च्या बसेसचे ब्रेकडाऊन वाढले

‘पीएमपीएमएल’च्या बसेसचे ब्रेकडाऊन वाढले

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 12:56AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएमएल बसेसच्या बे्रेक डाऊनचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या 20 लाख  लोकसंख्येसाठी भोसरी, निगडी आणि पिंपरी असे अवघे तीनच डेपो आहेत. पीएमपीएमएलने निगडीतील सेंट्रल वर्कशॉप बंद करून ही कामे डेपोंकडे वर्ग केली. कामाचा बोजा वाढल्याने बस पासिंगच्या कामकाजास विलंब होत असल्याने विविध मार्गार्ंवरील बस कमी झाल्या आहेत. 

सक्षम सार्वजनिक प्रवासी सेवा देण्यासाठी पीसीएमटी व पीएमटीचे विलीनीकरण करुन पीएमपीएमएलची निर्मिती करण्यात आली. मात्र, प्रवाशांच्या पदरात काहीच पडले नाही. बे्रकडाऊनचे प्रमाण कायम आहे. पिंपरी डेपोत शेड्युल 134 असून मार्गावर 112 ते 115 बसेस धावत आहेत. 15 बसेस दुरुस्तीअभावी बंद आहेत. रोजचा भरणा सव्वा आठ लाख रुपये आहे. निगडी डेपोत शेड्युल 173 असून मार्गावर 135 ते 140 बसेस धावत आहेत. रोजचा भरणा 12 ते 15 लाख आहे.

भोसरी डेपोचे शेड्युल 120 असून  पीएमपीएमएलच्या  आणि खासगी प्रत्येकी 51 अशा 102 बसेस मार्गावर धावत आहेत. आरटीओ पासिंग, स्वारगेट इंजिन बदलीसाठी आठ बस तर डेपोतील दुरुस्तीसाठी आठ बसेस बंद आहेत. रोजचा भरणा 9 लाख रुपये आहे.  वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नसलेली डेपोंची संख्या, सेंट्रल वर्कशॉप बंद करुन डेपोंच्या माथी मारण्यात आलेली जादा जबाबदारी हे ब्रेकडाऊनचे मुख्य कारण आहे. पीएमपीएमएलचे 13 डेपो असून त्यापैकी स्वारगेट, कात्रज, कोथरुड, बालेवाडी, नरवीर तानाजीवाडी, हडपसर, पुणे स्टेशन, भेकराई, शेवाळवाडी, मार्केटयार्ड हे दहा डेपो पुण्यात तर पिंपरी -चिंचवडसाठी पिंपरी, निगडी व भोसरी असे अवघे तीन डेपो आहेत.

सीआयआरटीच्या नॉर्म्सनुसार एक डेपो 100 बसेसचा असावा.  मात्र, पिंपरी -चिंचवडमध्ये हे प्रमाण जास्त असल्याने बसेस मार्गावर येण्यात मोठी अडचण येत आहे.   निगडी येथे सेंट्रल वर्कशॉप होते. या वर्कशॉपमध्ये बसेस पासिंगसाठी रंगरंगोटी, अपघातानंतरची दुरुस्ती आदी कामे केली जातात. मात्र, पीएमपीएमएलचे यापूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंंढे यांनी सेंट्रल वर्कशॉप बंद करुन त्यांची कामे डेपोकडे वर्ग केली. कामाचा बोजा वाढल्याने बस पासिंगच्या कामास विलंब होत आहे. दुसरीकडे बसेस दुरुस्तीअभावी डेपोत पडून आहेत.  मार्गावर कमी बसेस असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

नादुरूस्त बसेस पिंपरी व कोथरूड डेपोत पडून

पीएमपीएमएलने 200 बसेस ‘प्रसन्न’ ला चालविण्यासाठी दिल्या होत्या. या बसेसच्या दुरुस्ती, इंधन व चालकाचा खर्च ‘प्रसन्न’ द्वारा केला जात होता. किलोमीटरने पैसे पीएमपीएमएलला मिळत होते. मात्र, तुकाराम मुंढे यांनी या बसेस पुन्हा पीएमपीएमएलच्या ताब्यात घेतल्या. ‘प्रसन्न’  कडे या बसेस असताना 200 पैकी 170 बसेस ऑनरोड होत्या. आता 50 टक्केही बसेस मार्गावर नाहीत. नादुरुस्त अवस्थेत या बसेस कोथरुड व पिंपरी डेपोत पडून आहेत.