Mon, Jun 17, 2019 04:33होमपेज › Pune › ‘पीएमपीएमएल’च्या पिंपरीतील विभागीय कार्यालयाला नाही वाली

‘पीएमपीएमएल’च्या पिंपरीतील विभागीय कार्यालयाला नाही वाली

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 12:48AM

बुकमार्क करा

पिंपरी : नरेंद्र साठे

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी-चिंचवडला पहिल्यापासून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. त्याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडकरांना येत आहे. पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहाशेजारी पीएमपीएमएलचे विभागीय कार्यालय आहे. मात्र, दि. 1 डिसेंबरपासून या ठिकाणी एकही वरिष्ठ अधिकारी कार्यरत नाही. यामुळे नागरिकांच्या प्रश्‍नांसह इतर कामे तशीच पडून आहेत. 

पीएमटी आणि पीसीएमटी या दोन्ही संस्थांच्या एकत्रीकरणानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये देखील एखादे विभागीय कार्यालय असावे, अशी येथील लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्यानुसार सर्वांच्या सोईसाठी पिंपरीत विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. या ठिकाणाहून नागरिकांच्या समस्या सोडवण्यापासून पीएमपीएमएलचा काही प्रशासकीय कामांचा निपटारा देखील केला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीच्या मुख्य कार्यालयामधील मुख्य दुवा म्हणून देखील हे कार्यालय भूमिका निभावते.

शहरातील विविध भागातील लोकप्रतिनिधी त्यांची तक्रार, सूचना घेऊन स्वारगेटला जाण्याऐवजी येथेच अर्ज देऊन किंवा अधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्‍न सोडवून घेतात. शहरातील अनेक संघटना, ज्येष्ठ नागरिक मंच पीएपीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून समस्या मांडत असतात. या ठिकाणी कोणी वरिष्ठ अधिकारी ऐकून घेणारच नसल्याने रिकाम्या खुर्च्यांना निवेदन देऊन गार्‍हाणे मांडायाचा का, असा प्रश्‍न एका ज्येष्ठ नागरिकाने उपस्थित केला आहे. सध्या कार्यालयाला कोणीच वाली नसल्याने नागरिकांनी पीएमपीसंदर्भात समस्या मांडायच्या कुणाकडे, असा प्रश्‍न पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे.