Wed, Apr 24, 2019 15:40होमपेज › Pune › ‘पीएमपीएमएल’च्या 422 कालबाह्य बसेस  रस्त्यावर

‘पीएमपीएमएल’च्या 422 कालबाह्य बसेस  रस्त्यावर

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 06 2018 11:13PMपुणे : नवनाथ शिंदे 

शहरातील प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा डांगोरा पिटणार्‍या पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून चक्क आयुर्मान संपलेल्या बसद्वारे नागरिकांची धोकादायकरित्या ने-आण केली जात आहे. फक्त आर्थिक उत्पन्न वाढीसाठी तब्बल 422 कालबाह्य बसेसद्वारे नागरिकांची असुरक्षित वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघात घडून प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात 1 हजार 440 बसेस आहेत. तर ठेकेदारांकडून भाडेतत्त्वावर चालविण्यात येणार्‍या बसेसची संख्या 653 आहे. दरम्यान, महामंडळाच्या ताफ्यातील असणार्‍या बसेसपैकी 10 ते 14 वर्षांपेक्षा जास्त आर्युमान असलेल्या बसेसची आकडेवारी 394 आहे.  तर 15 वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या 28 गाड्या महामंडळाकडून विविध रस्त्यांवर चालविल्या जात आहेत. पीएमपीएमएल महामंडळाच्या धोरणानुसार 8 लाख 40 हजार किलोमीटर झालेल्या बसेस स्क्रॅप करणे आवश्यक आहे. तसेच 12 वर्षांपेक्षा अधिक वयोमान झालेल्या बसेस वाहतूकीसाठी रस्त्यावर आणण्यास बंदी आहे. प्रत्यक्षात मात्र, महामंडळाने तयार केलेल्या धोरणाला हरताळ दिला असून, आर्युमान संपलेल्या बसेसद्वारे प्रवाशांची असुरक्षित वाहतूक केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएमपीएमएल महामंडळ आणि खासगी ठेकेदारांकडून भाडेतत्त्वावर चालविण्यात  येणार्‍या अनेक बसेस आर्युमान संपलेल्या अवस्थेत आहेत. तरीही अशा बसद्वारे बिनदिक्कतपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.