Tue, Mar 19, 2019 15:50होमपेज › Pune › नववर्षापासून‘पीएमपी’सुसाट

नववर्षापासून‘पीएमपी’सुसाट

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 12:43AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

जानेवारी महिन्यापासून पीएमपीतर्फे प्रवासी सेवा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीएलच्या दैनंदिन शेड्यूल्समध्ये  वाढ करण्यात आली आहे. पूर्वी असलेल्या  1 हजार 436 शेड्यूल्समध्ये 374 शेड्यूल्सची वाढ केली असून, ती आता  1 हजार 810 करण्यात आली आहे.  त्यानुसार आता बसेसच्या दररोज 24 हजार 300 फेर्‍या करण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दिली. 

मुंढे  यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील  आठ महिन्यांत  प्रवासी संख्या, फेर्‍या, तसेच प्रत्येक मार्गाचे परीक्षण, प्रवाशांची मागणी या गोष्टींचा विचार  करून पीएमपीएलच्या रोजच्या शेड्यूल्स आणि फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 1 हजार 810 शेड्यूल्सपैकी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून 1 हजार 620 शेड्यूल्स प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत; तर उर्वरित शेड्यूल्स जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहेत.

बारा नवीन मार्ग सुरू होणार 

मार्गांचे सर्वेक्षण आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करत नवीन  वर्षात तब्बल 12 नवीन मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार  स्वारगेट - वाघोली (पुलगेट, मगरपट्टा सिटी, खराडीबायपास मार्गे),   हडपसर - वाघोली (थेऊर, साष्टे, केसनंद मार्गे), स्वारगेट - उंड्री गाव (देसाई हॉस्पिटल, महंमदवाडी मार्गे), वारजे माळवाडी - केशवनगर (मुंढवा, मनपा, घोरपडी मार्गे), कात्रज - सासवड (कोंढवा हॉस्पिटल, बोपदेवघाट, भिवरी मार्गे), वडगाव मावळ - चाकण (तळेगाव स्टेशन, म्हाळुंगे मार्गे), भोसरी - वाघोली (विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव मार्गे), घोटवडे फाटा - पिंपरी रोड (कस्पटे वस्ती, हिंजवडी- शेळकेवाडी फाटा मार्गे) हे मार्ग  जानेवारीपासून सुरू होत आहेत. तसेच  भोसरी - पाबळ फाटा (चाकण, शिक्रापूर मार्गे), मुकाई चौक -  हिंजवडी (रावेत, पुनावळे, डांगे चौक मार्गे), वडगाव मावळ - हिंडवडी (सोमाटणे, विकासनगर, भूमकर चौक मार्गे),  चिंचवड गाव - कोथरूड स्टँड (डेक्कन, औंध, डांगे चौक मार्गे)  हे चार मार्ग जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहेत.  या मार्गांवर 90 शेड्यूल्सच्या माध्यमातून 1 हजार 144  फेर्‍या होणार आहेत.

महिलांसाठी 30 विशेष बसेस उपलब्ध 

जानेवारी महिन्यापासून शहरातील महिलांसाठी 30 विशेष बस उपलब्ध होणार आहेत. सकाळी आणि संध्याकाळी या  बसेस रस्त्यावर धावणार आहेत.

गर्दीच्या वेळी दररोज 636 जादा फेर्‍या

पीएमच्या बसेसना सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीच्या वेळेतही प्रवाशांना चांगली सेवा  उपलब्ध करून देण्यासाठी सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4.30 ते 8.30 या वेळेत 75 शेड्यूल्सच्या माध्यमातून 636 जादा फेर्‍या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये  सकाळी  340; तर संध्याकाळी  296 फेर्‍या असणार आहेत. 

‘व्हीएचएमएस’च्या माध्यमातून होणार बसेसची तपासणी

वारंवार बंद पडणार्‍या; तसेच नादुरुस्त होणार्‍या पीएमपीएलच्या सर्वच बसेसचीतपासणी आता व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम (व्हीएचएमएस) या यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. यामुळे बसेसची इंजिनपासून ते इलेक्ट्रिकपयर्र्ंत सर्व सिस्टिमची माहिती संगणकावर उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या आधारावर फीट  असलेल्या बसेस रस्त्यावर वाहतुकीसाठी सोडण्यात येणार आहेत. ही यंत्रणा खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांत ही यंत्रणा उपलब्ध करण्यावर भर राहणार आहे, अशी माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

मागील कित्येक वर्षांपासून पीएमपीएलला बसेस बे्रक डाऊन, अचानक बंद पडणे अथवा पेट घेणे या समस्येने ग्रासले आहे. साधारणपणे रोज सुमारे 300 बस ब्रेकडाऊन होत असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे; मात्र तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ब्रेकडाऊनवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे मागील आठ महिन्यांत ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झाले. मात्र अजूनदेखील पाहिजे असे ब्रेकडाऊनचे प्रकार थांबलेले नाहीत; त्याचप्रमाणे बसला अपघात होणे, रात्रीच्या विजेची समस्या, पेट घेणे असे प्रकार अजून अधूनमधून सुरू आहेत.

या सर्व घटनांवर कायम उपाययोजना करण्यासाठी पीएमपीएल ‘व्हीएचएमएस’ यंत्रणा खरेदी करणार आहे. या  सिस्टिममुळे संगणकीय पद्धतीने बसेसची तपासणी होणार आहे. त्यानुसार कोणत्या बसमध्ये काय समस्या आहे हे समजणार आहे. सध्या बसेसला काय समस्या आहे याची तपासणी सध्या मेकॅनिक करीत आहेत. मात्र, व्हीएचएमएस यंत्रणेद्वारे बसमधील समस्या संगणकावरच समजणार आहे. त्यानुसार मेकॅनिकच बसची दुरुस्ती करणार आहेत, असे मुंढे यांनी सांगितले.