Mon, May 27, 2019 08:48होमपेज › Pune › पीएमपी प्रवाशांना तिकीट दरवाढीचा झटका?

पीएमपी प्रवाशांना तिकीट दरवाढीचा झटका?

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 12:48AMपुणे : नवनाथ शिंदे

इंधन दरवाढीमुळे मागील दोन महिन्यात डिझेलचा दर आठ रुपयांवर गेल्याने अडचणीत आलेल्या पीएमपीच्या तिकीट दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. जाहिराती आणि इतर माध्यमातून तग धरण्याचा प्रयत्न सुरु असला, तरी डिझेलचे भाव नियंत्रणात न आल्यास प्रवाशांना तिकीट दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूकीचा मुख्य कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएल) इंधनदरवाढीचा चांगलाच फटका बसला आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळाला दरदिवसाला तब्बल 3 लाख 60 हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळास महिन्याला 1 कोटी 80 लाखाचा फटका बसत आहे. मार्च ते मे दरम्यान डिझेल तब्बल 8 रूपये 28 पैशांनी वाढल्यामुळे महामंडळाचा नफा दिवसेंदिवस कमी होत आहे. तर सीएनजीच्या दरात 1 रुपया 20 पैशांनी वाढ झाल्याने पीएमपीएलचा आर्थिक कणा मोडला आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षमरित्या करण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून सतत होणारी इंधनवाढ प्रशासनाच्या आर्थिंक गणिते बिघडवत आहे. 

पीएमपीएलच्या ताफ्यात 2 हजार 66 बसेस आहेत. त्यापैकी  विविध बसस्थानकाहून 842 डिझेल बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची ने-आण केली जाते. तर विविध मार्गावर 571 सीएनजी बसेस धावत आहे. 653 बसेस भाडोत्री तत्त्वावर चालविल्या जातात. विविध फेर्‍यांसाठी एका बसला दिवसभरासाठी 70 ते 75 लीटर डिझेल भरावे लागते. इंधन दरवाढीमुळे दरदिवशी एका बसमागे 600 रुपयांचा खर्च वाढला आहे. पीएमपीएलला एचपीसीएल कंपनीच्या माध्यमातून सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करण्यात येते.

त्यामध्ये 80 पैसे सबसिडी आणि 3 रूपये 52 पैसे कमीशन, मिळून 4 रूपये 32 पैशांचा फायदा होतो. मार्चमध्ये पीएमपीएला प्रतिलीटर 60 रुपये 95 पैसे दराने डिझेल उपलब्ध करण्यात येत होते.  दरवाढीमुळे मे महिन्यात पीएमपीएलला प्रतिलीटर  दर 68 रूपये 28 दराने डिझेलची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे मार्च ते एप्रिलच्या 80 दिवसांच्या कालावधीत पीएमपीएलला तब्बल 2 कोटी 60 लाखांवर तोटा सहन करावा लागला आहे. सध्या पीएमपीएलचा सवलीच्या दरात मिळणार्‍या सीएनजीचा दर 47  रूपये 80 पैसे आहे. मागील काही दिवसात सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपया 20 पैशांची वाढ झाल्यामुळे महामंडळाला दिवसाला 1 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे पीएमपीएलची झोळी रिकामी होत चालली आहे. 

तिकीट दरवाढ होणार?

इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील दोन महिन्यात डिझेलची प्रतीलिटर तब्बल 8 रूपये 28 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महामंडळास दरदिवशी 3 लाख 60 हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे तिकीट दरवाढीची चर्चा प्रशासकीय पातळीवर आहे.