Fri, Jul 19, 2019 18:04होमपेज › Pune › ‘पीएमपी’ आणि प्रवाशांचे हित जपणारे निर्णय

‘पीएमपी’ आणि प्रवाशांचे हित जपणारे निर्णय

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:12AMपुणे :  प्रतिनिधी 

पीएमीपीचे तत्कालीन अध्यक्ष मुंढे यांच्या कार्यकालात  प्रशासनाने घेतलेले निर्णय हे पीएमपी आणि प्रवाशांचे हित जपणारे असतील तर त्यामध्ये  बदल केले जाणार नाहीत; मात्र पुन्हा एकदा या निर्णयाबाबत आढावा घेतला जाईल, असे  मत नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी व्यक्त केले.

सोमवारी नयना गुंडे यांनी आपल्या पदाचीसूत्रे स्वीकारली. त्यांनंतर  पत्रकारांशी बोलताना पीएमपी बाबत भूमिका स्पष्ट केली. दरम्यान पदभार स्वीकारल्यनंतर विभागप्रमुखांची बैठक घेऊन, पीएमपीच्या कामकाजाबाबत  माहिती घेतली. येत्या महिन्याभरात पीएमपीच्या कामकाजाची माहिती, आढावा, तसेच आतापर्यत घेण्यात आलेले निर्णय समजावून घेण्यात येतील, असे गुंडे यांनी सांगितले. 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुंढे यांनी घेतलेल्या बहुतांशी निर्णयांवर कर्मचारी  संघटनांनी आक्षेप  घेतलेले आहेत. असे पत्रकरांनी विचारले असता गुंडे  म्हणाल्या, मुंढे यांनी घेतलेले बहुतांशी निर्णय चांगले आहेत. या निर्णयावरच प्रशासनाची वाटचाल सक्षम होईल. कर्मचार्‍यांची बदली, तसेच कारवाईबाबत असलेल्या आक्षेपावर आढावा घेण्यात येणार आहे. कर्मचार्‍यांच्या सोयीचाही विचार होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठी दीर्घकालीन नियोजन अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार किमान 15 लाख प्रवासी मिळविण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे काम आव्हानात्मक असून, थेट नागरिकांशी संपर्क येत असल्यामुळे काम करण्यास वाव आहे. परदेशात लोकप्रतिनिधी सार्वजनिक बसचा जसा वापर करतात, तसाच वापर शहरातही व्हायला हवा, तसेच जास्तीतजास्त नागरिकांनी बसचा वापर केला तर रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

‘पीएमपी’च्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान नयना गुंडें यांना

पीएमपी’च्या पहिल्या महिला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होण्याचा मान नयना गुंडे यांना मिळाला आहे. गुंडे यापूर्वी  वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

शासनाने  तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली केली. त्यानंतर पीएमपीची जबाबदारी  गुंडे यांच्यावर  सोपविण्यात आली. दहा वर्षाच्या कालावधीत चौदा अधिकार्‍यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. मात्र केवळ आर.एन.जोशी या अधिका-याने या पदाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. उर्वरित अधिकार्‍यांनी दहा महिने तसेच दीड  वर्षे असा कार्यकाल पूर्ण केला आहे.  सोमवारी  सूत्रे स्वीकारल्यानंतर  सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी नयना गुंडे यांचे  स्वागत केले. यावेळी ‘पीएमपी’चे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर गुंडे यांनी अधिकार्‍यांकडून कामकाजाविषयी माहिती घेतली.