Sat, Apr 20, 2019 18:21होमपेज › Pune › ‘पीएमपी’चे पिंपरीतील विभागीय कार्यालय पुन्हा सुरू होणार

‘पीएमपी’चे पिंपरीतील विभागीय कार्यालय पुन्हा सुरू होणार

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 12:14AMपुणे ः शिवाजी शिंदे/नरेंद्र साठे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) नवीन आस्थापना आराखड्यात पिंपरी-चिंचवड येथील ‘पीएमपीएमएल’चे विभागीय कार्यालय डिसेंबरमध्ये बंद केले होते. यासंदर्भात पहिल्यांदा ‘पुढारी’ने विभागीय कार्यालय बंद केल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली होती.  त्यानंतर  लोकप्रतिनिधींनी पीएमपी प्रशासनाकडे याबाबत जाब विचारण्यास सुरूवात केली. याची दखल घेत अखेर पीएमपीएमएल प्रशासनाकडून पिंपरी-चिंचवडचे विभागीय कार्यालय  पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड येथील नारायण मेघाजी लोखंडे भवनमध्ये पूर्वी विभागीय कार्यालय होते. तेथील कार्यालय बंद करून त्याठिकाणच्या कर्मचार्‍यांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे कार्यालयाला टाळे लागले. परिणामी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पीएमपीएमएलच्या संदर्भात काही कामे असतील तर थेट स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात यावे लागत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संदर्भात किंवा लोकप्रतिनिधींना पत्रव्यवहार करण्यासाठी थेट पुण्यात हेलपाटे मारावे लागत होते. नागरिकांना तसेच प्रशासकीय कामाला पुण्यात चकरा मारणे जिकरीचे झाले. शहरातील ज्येष्ठ नागरिक पीएमपीएमएलच्या कारभाराबाबत नेहमी सजग असतात. त्यांच्याकडून सूचना किंवा कौतुकाचे सतत पत्रव्यवहार ‘पीएमपीएमएल’ला केला जातो. त्यासाठी या मंडळींना पुण्यात येणे परवडणारे नसल्याने त्यासंदर्भात ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

पिंपरी-चिंचवड येथील विभागीय कार्यालय 2007 च्या दरम्यान सुरू झाले होते. यामुळे पीएमपीएमएलच्या संदर्भातील सर्व कामे विभागीय कार्यालयातून माहिती पिंपरी-चिंचवडकरांना मिळत होती. महापालिकेच्या योजनेतील विद्यार्थी पास, अपंग पास किंवा अन्य योजनांचा लाभ येथून मिळत होताच. त्याचबरोबर चेकर आणि स्टार्टरच्या ड्यूटीचे नियोजन येथून केले जात होते. त्यामुळे पुन्हा एकदा पूर्वीसारखेच नव्या दमाने विभागीय कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

pune, pune news, PMP department, Pimpri office