Sun, Mar 24, 2019 04:50होमपेज › Pune › ‘पीएमपी’चे पिंपरीतील विभागीय कार्यालय बंद

‘पीएमपी’चे पिंपरीतील विभागीय कार्यालय बंद

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 08 2017 11:29PM

बुकमार्क करा

पिंपरी : नरेंद्र साठे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नवीन आस्थापना आराखड्यात पिंपरी-चिंचवड येथील  नारायण मेघाजी लोखंडे सभागृहातील ‘पीएमपी’चे   विभागीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

येथील विभागीय प्रमुख आणि लिपीक यांची बदली पुण्यातील मुख्य कार्यालयात केली असून, सध्या पिंपरीच्या विभागीय कार्यालयात केवळ एकच व्यक्ती कामास शिल्लक असल्याचे समजते. मुख्य कार्यालयाच्या छताखालूनच सर्व कामकाज चालावे याकरिता पिंपरीतील विभागीय कार्यालय बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. 

लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पिंपरीमध्ये पीएमपीचे विभागीय कार्यालय 2007 च्या दरम्यान सुरू केले होते. यामुळे पीएमपीच्या संदर्भातील सर्व माहिती या विभागीय कार्यालयातून शहरवासीयांना मिळत होती. याचबरोबर पिंपरी- महापालिकेला देखील पत्रव्यवहार करताना कार्यालयामुळे सोपे जात होते. येथून चेकर आणि स्टार्टरच्या ड्युटीचे नियोजन होत असे. शहरातील विविध भागातील लोकप्रतिनिधी त्यांची तक्रार, सूचना घेऊन विभागीय कार्यालयात अधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्‍न सोडवून घेत असत परंतु आता लोकप्रतिनिधींना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट व्यवस्थपाकीय   संचालकांचीच भेट घ्यावी लागणार किंवा स्वारगेटमधील अधिकार्‍यांना भेटण्यास जावे लागणार आहे. तीच रिस्थिती नागरिकांची देखील होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या वाढीबरोबरच उपनगरे वाढत आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडला पीएमपीच्या बसेसची अपुरी संख्या व अवघे तीन डेपो यामुळे प्रवाशांना जलद व सुखकर सुविधा मिळत नाही. विलीनीकरण झाले तेव्हा पुण्यात 7 तर पिंपरी-चिंचवड ला 3 डेपो होते. विलीनीकरणानंतर पुण्यातील भेकराई ,शेवाळवाडी,बालेवाडी या ठिकाणी नवीन बसडेपो झाले. पिंपरीसाठी मात्र नेहरूनगर, निगडी आणि भोसरी असे तीनच डेपो आहेत. शिवाय होते ते विभागीय कार्यालय देखील पीएमपीएमएल प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवडकरांना नेहमीच वेगळी वागणूक मिळत असल्याचे नागरिक म्हणत आहेत. यासंदर्भात पीएमपीएमएल वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.