Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Pune › पीएमपी बसथांब रिकाम टेकड्यांचे थांबे

पीएमपी बसथांब रिकाम टेकड्यांचे थांबे

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:06AMपुणे : हिरा सरवदे 

शहरात जुने बसथांबे असतानाही त्या शेजारी आमदार आणि खासदार निधीतून नव्या रचनेचे बसथांबे उभारले गेले आहेत. नव्या रचनेचे बस थांबे अनावश्यक ठिकाणी केल्याने हे थांबे सध्या रिकामटेकड्या लोकांचे ‘थांबे’ झाले आहेत. थांब्यांवर अनेकवेळा भंगार साहित्य ठेवल्याचे आणि नागरिक झोपल्याचे चित्र पाहायला मिळते. नव्याने उभारण्यात आलेले बसथांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. 
शहरात जागोजागी पीएमपीएमएल बस थांबण्यासाठी बस थांबे तयार केले आहेत. एक किलोमीटर, अर्ध्या किलोमीटरवर हे बसथांबे तयार केले आहेत. अनेक ठिकाणी जुने बसथांबे सुस्थितीत असतानाही त्या शेजारी नवीन थांबे उभारण्यात आले आहे. काही ठिकाणी आमदार निधीतून तर काही ठिकाणी खासदार निधीतून हे थांबे उभारण्यात आले आहेत. नवीन थांबे झाल्यानंतर जुने बसथांबे काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप जुने बसथांबे काढण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी जुना बसथांबा, आमदार आणि खासदार निधीतील असे तीन-तीन बसथांबे आहेत. नागरिकांकडून मात्र जुन्याच बसथांब्यांचा वापर केला जातो. 

ज्या रस्त्यांवर पीएमपीच्या बस जातच नाहीत, किंवा जाणार्‍या बसची संख्या नगण्य आहे, अशा ठिकाणी जुने आणि नवे तीन-तीन बसथांबे आहेत. बहुतेक ठिकाणी जुन्या थांब्याजवळच बस थांबतात. त्यामुळे आमदार आणि खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या बसथांब्याचा वापरच होत नाही. त्यामुळे या थांब्यांवर रिकामटेकडे दिवसेंदिवस झोपलेले दिसतात. अनेकवेळा भंगार व कागद पत्रा गोळा करणार्‍यांकडून बसथांब्यावर भंगार भरलेल्या मोठ मोठ्या गोण्या ठेवल्या जातात. काही बसथांब्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केले आहेत. दुसरीकडे अनावश्यक बसथांब्यांमुळे इमारतींमधील गाळ्यांमधील व्यावसायिकांचा व्यवसाय कमी झाला आहे.

बसच थांबत नाही, तरीही बसथांबे

सारसबागेसमोर कोणत्याही प्रकारची पीएमपी बस थांबत नाही. सणस मैदानाजवळ बहुतेक बस थांबतात. तरीही सारसबागेसमोरील जुन्या बसथांब्याशेजारी नवीन बसथांबा उभा करण्यात आला आहे. अशाच पद्धतीने मित्रमंडळ चौकातून नगण्य बस ये-जा करतात. याचे प्रमाण दिवसाला एक किंवा दोन बसचे आहे. तरीही दोन्ही बाजूंना जुने आणि नवे असे दोन-दोन बसथांबे उभारण्यात आले आहे. त्यामुळे या थांब्यांचा वापर नागरिक झोपण्यासाठी करताना दिसतात.

नव्या बसथांब्यांची दुरवस्था

आमदार आणि खासदार निधीतून साकारण्यात आलेल्या नव्या रचनेच्या बस थांब्यांचा वापर बहुतांश ठिकाणी होत नाही. नागरिक जुन्याच बसथांब्यांवर थांबतात. बसही त्याच ठिकाणी थांबते. त्यामुळे नवे बसथांबे फक्त नावालाच झाले आहेत. स्टीलचा वापर करून तयार केलेल्या या नव्या बसथांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आढळते. अनेक थांब्यांचे छताची आणि पाठीमागील बाजूचे पत्रे निखळून लटकत आहेत. हे बसथांबे फक्त लहान लहान जाहिराती चिकटवण्याच्याच कामासाठी उभे केले आहेत, की काय असा प्रश्‍न त्यांच्याकडे पाहिल्यावर उपस्थित होतो.

Tags : Pune, PMP, bus, stops, use