होमपेज › Pune › आणखी एक ‘पीएमपी’ खाक

आणखी एक ‘पीएमपी’ खाक

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 12:51AMपिंपरी : प्रतिनिधी

प्रवासी घेऊन निगडीहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पीएमपी बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाली. ही घटना पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. 

दरम्यान, पीएमपी बस पेटण्याचा हा गेल्या काही दिवसातील सातवा प्रकार असून, एकापाठोपाठ एक घटना घडत असतानाही पीएमपीच्या तांत्रिक विभागाला यावर तोडगा सापडलेला दिसत नाही. याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी दुपारी निगडीवरून पुण्याच्या दिशेने बस निघाली होती. मोरवाडी चौकातील सिग्नल सोडल्यानंतर बसच्या समोरील बाजूने धूर येऊ लागला. यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि प्रवाशांना तत्काळ खाली उतरवून सुखरूप ठिकाणी जाण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः चालक, वाहकही तेथून बाहेर पडले. अग्निशामक दलास याबाबतची माहिती दिली. तत्काळ पिंपरी अग्निशमन विभागाचा बंब आणि जवान घटनास्थळावर दाखल झाले; मात्र बसने तोपर्यंत पूर्णपणे पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली.

आगीचे व धुराचे लोट बसमधून बाहेर येत असल्याने परिसरात पूर्ण धूर पसरला होता. धुराचे लोट प्रचंड असल्याने रस्त्यावरील वाहने दिसणे कठीण झाले होते. त्यामुळे निगडीवरून पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आली होती.