Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Pune › पीएमपी’ बस पेटली; पुण्यातही आणि पिंपरीतही

पीएमपी’ बस पेटली; पुण्यातही आणि पिंपरीतही

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:47PM

बुकमार्क करा

पुणे/पिंपरी : प्रतिनिधी 

पीएमपीएलचा कारभार रुळावर येत असल्याचे दावे केले जात असतानाच बुधवारी शहर आणि चिंचवडमध्ये दोन प्रवासी भरलेल्या चालत्या बस गाड्यांनी रस्त्यावरच पेट घेतला. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नसली तरी, दहा दिवसांमध्ये अशा प्रकारे बसने पेट घेतल्याची तिसरी घटना घडल्याने प्रवासी सुरक्षा आणि एकूणच पीएमपीएलच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

पुणे शहरातील घटना आरटीओ चौकात घडली. तर, चिंचवडमधील घटना चिंचवड गावातील शहीद अशोक कामटे बस थांब्यावर घडली. पुणे स्टेशन ते संभाजीनगर-आकुर्डी ही पीएमपीएल बस दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास प्रवासी घेऊन निघाली होती. बसमध्ये 21 प्रवासी होते. बस पुणे स्टेशनपासून आरटीओ चौकात आल्यानंतर अचानक चालकाला बसमध्ये स्पार्किंग होऊन काही तरी जळत असल्याचा वास येऊ लागला. त्याने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभा केली. तसेच, प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर अचानक बसच्या इंजिनमधून मोठ्या प्रमात धूर येऊ लागला आणि आग मोठ्या प्रमाणात भडकली. काही वेळातच आगीने रुद्र रूप धारण केले. नागरिकांनी तात्काळ आग्निशामक दलाला माहिती दिली. 

चिंचवड गावात शहीद अशोक कामटे बस थांब्यावर उभी असलेली पीएमपीएमएल बस आगीत जळून खाक झाली. बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. बुधवारी (दि. 7) दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली.

मागील दहा दिवसांमध्ये पीएमपी बसने पेट घेण्याची ही तिसरी घटना होती. याअगोदर दि. 27 नोव्हेंबरला दिवे घाटात बसने पेट घेतला होता, तर दि. 4 डिसेंबर रोजी सिंहगड रोडवर बसने पेट घेतला होता. नेमक्या कुणाच्या चुकीमुळे बस पेट घेत आहेत याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. मार्ग क्रमांक 313 वरील चिंचवड ते चांदखेड-नेहरूनगर डेपोची  एमएच 12एचबी 401 या क्रमाकांची बस पूर्ण जळून खाक झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन अग्निबंबांनी आग विझवली. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

काम संपल्यानंतर चालकाने चिंचवड गावतील शहीद अशोक कामटे बस स्थानकावर बस चालू अवस्थेत उभी केली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आग एवढी मोठी होती की, धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आग कशामुळे लागली होती याचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.