Wed, Mar 27, 2019 00:28होमपेज › Pune › पीएमपीच्या साडेपाच हजार फेर्‍या होताहेत रद्द

पीएमपीच्या साडेपाच हजार फेर्‍या होताहेत रद्द

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी 

शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या ‘पीएमपीएमएल’ला नियमानुसार बसेस उपलब्ध होत नसल्यामुळे सध्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. पीएमपी प्रशासनाने 325 मार्गासाठी रोज सुमारे 22 हजार 416 फेर्‍यांचे नियोजन केलेले असते. मात्र प्रत्यक्षात केवळ 17 हजारच्या आसपास फेर्‍या होत असून, सुमारे साडेपाच हजार फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की वाहतूक विभागावर येत आहे. याचा फटका प्रवाशांना चांगलाच बसत आहे.

शहर आणि पिंपरी भागातील सुमारे दहा लाख प्रवाशी पीएमपीच्या बसने प्रवास करीत आहेत. त्यातही सकाळ आणि संध्याकाळी पीएमपीच्या बसेसना प्रमाणापेक्षा जास्त गर्दी असते. त्यामुळे या वेळेत जादा बसेसची गरज प्रवाशांना असते. विशेषत: चाकरमाने बसने सर्वात अधिक प्रवास करीत असतात. मात्र पीएमपीच्या वाहतूक विभागाचे गणित कायमच चुकलेले असल्यामुळे फेर्‍यामध्ये रोजच तफावत दिसून येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे रोजच्या उत्पनात देखील सरासरेपेक्षा चांगलीच घट झालेली आहे. 

पीएमपीच्या ताफ्यात स्वत:च्या सुमारे 1 हजार 400 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. मात्र प्रत्यक्षात पीएमपीच्या एक हजार तर ठेकेदारांच्या अवघ्या चारशे बसेसच्या माध्यमातून विविध मार्गावर फेर्‍या करण्यात येत आहेत. साधारणपणे पीएमपीच्या चारशे आणि ठेकेदारांच्या 250 बसेसचे मार्गावर येत नाहीत. दोन्ही मिळून साडेसहाशे बसेस रस्त्यावर येत नसल्यामुळे नाईलाजाने वाहतूक विभागास फेर्‍या रद्द कराव्या लागत आहेत. 

पीएमपीच्या वाहतूक विभागाच्या वतीने रोज 325 मार्गावर बसेसच्या फेर्‍यांचे नियोजन करण्यात येत असते. या नियोजनाची माहिती पीएमपीच्या संकेतस्थळावर रोजच्या रोज प्रवाशांच्या माहितीसाठी टाकण्यात येत असते. मागील काही दिवसांपासून संकेतस्थळावर सुमारे 25 हजार 416 एकूण फेर्‍यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र प्रत्यक्षात 17 हजारांच्या आसपास रोज फेर्‍या होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. बसेस उपलब्ध होत नसल्यामुळे रोज सुमारे साडेपाच हजार फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की वाहतूक विभागावर येत आहे. परिणामी प्रवाशांना त्याचा मनस्ताप होत आहे.

वास्तविक पाहता पीएमपीच्या बसेसच्या माध्यमातून रोज सुमारे दहा लाख नागरिक प्रवास करीत असतात. मात्र बसेसची उपलब्धता कमी असल्यामुळे प्रवाशांची संख्या मागील काही महिन्यात घटली असून ती सध्या आठ ते साडेआठ लाखांच्या आसपास आली आहे. साधारपणे दीड ते दोन लाख प्रवाशांची संख्या घटल्यामुळे मागील काही वर्षामध्ये रोज किमान 1 कोटी 75 लाख रूपयांपर्यत होत असलेले उत्पन्न घटून ते 1 कोटी 30 लाख रूपयांच्या आसपास आले आहे. रोज सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख रूपयांचे नुकसान होत आहे.