Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Pune › पीएमपीच्या ३७७ दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना करणार निलंबित

पीएमपीच्या ३७७ दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना करणार निलंबित

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 12 2018 12:21AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

सतत गैरहजर राहणे, बेशिस्त वर्तन आणि मनमानी करणार्‍या पीएमपीमधील सुमारे 377 कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 

पीएमपी प्रशासनाच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचार्‍याने महिन्यातून किमान 21 दिवस कामावर उपस्थित असणे बंधकारक आहे. परंतु, मागील किमान सहा महिन्यांपासून काही कर्मचारी वारंवार दांडी मारत होते. त्यांचे हजेरीपत्रक प्रशासनाने अचानक तपासले. त्यानुसार सुमारे 377 कर्मचारी महिन्यातील 21 दिवस कामावर नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना आता निलंबित करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले. 

पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून कर्मचार्‍यांना त्याचप्रमाणे अधिकार्‍यांना बेशिस्त वर्तवणूक करणे, कामावर उपस्थित न राहण्याबाबत सूचना, नोटीस देण्यात येत होत्या. तरीदेखील यास न जुमानता सुमारे 377 कर्मचारी गैरहजर राहिले आहेत. आता या कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येणार आहे.

पीएमपीचे अधिकारी अथवा कर्मचारी अचानक गैरहजर राहिल्यामुळे बसेसचे वेळापत्रक कोलमडते. नियोजित मार्गावर बस वेळेवर जात नाही. परिणामी प्रवाशांचे हाल तर होतातच तसेच पीएमपी प्रशासनास आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ही बाब लक्षात घेऊन निलबंनाची कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे. यापूर्वीसुध्दा सतत गैरहजर राहणारे वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी यांना काही दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.  पीएमपीची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी कर्मचार्‍यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. तसेच नियमावर बोट ठेवत कर्मचार्‍यांनी 21 दिवस कामावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमाकडे कर्मचारी दुर्लक्ष करीत होते. त्यामुळेच या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.