Tue, Mar 26, 2019 20:24होमपेज › Pune › ‘पीएमपी’ ताफ्यामध्ये १५० ई-बसेस होणार दाखल

‘पीएमपी’ ताफ्यामध्ये १५० ई-बसेस होणार दाखल

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी 

पीएमपीच्या  ताफ्यात वर्षात केवळ 100 ते 150 ई-बस (वातानुकूलित) दाखल होतील. अगोदर  500 बस घेणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता; मात्र त्याबाबत झालेल्या बैठकीत सध्या फक्त  100 ते 150 बसेस घेण्यालाच मान्यता देण्यात आली आहे.त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरवा कंदील दाखविला आहे.

‘पीएमपी’च्या ताफ्यात असलेली अपुर्‍या बसेसची संख्या लक्षात घेऊन 500 ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत, असे पीएमपीचे  संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी सांगितले होते. मात्र याबाबत पीएमपीच्या अध्यक्षा, महापालिकेचे आयुक्त, सीआयआरटीचे अधिकारी यांची मागील आठवड्यात बैठक झाली. त्या बैठकीत 100 ते 150 बस घेण्यावरच शिक्कामोर्तब झाले आहे; मात्र या बसेस घेण्यासाठी खूप कालावधी लागणार आहे.

या ई-बसेसबाबत झालेल्या बैठकीत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी)ने ई-बाबतचे सादरीकरण झाले. ई-बसेससाठी जागेची उपलब्धता, निधी, निविदा प्रक्रिया यांसह विविध मुद्यांवर  चर्चा झाली.विशेष म्हणजे भारतात आतापर्यंत एकाही शहरात सार्वजनिक वाहतुकीत ई-बसचा वापर करण्यात आला नाही. ई-बसेची देखभाल-दुरुस्ती,  खर्च, फायदे-तोटे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. 

तसेच या बसेसच्या देखभालीसाठी तज्ज्ञांची कमतरता आहे. त्यामुळे एकाच वेळी 500 बस घेणे, योग्य ठरणार नाही. यावर बैठकीत ठरले आहे. ही बाब लक्षात घेऊन  केवळ 100 ते 150 बस घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिली.