Sun, Jul 21, 2019 01:43होमपेज › Pune › ‘पेटा’च्या कार्यकर्त्याचे सदस्यत्व होणार रद्द 

‘पेटा’च्या कार्यकर्त्याचे सदस्यत्व होणार रद्द 

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 2:03AMपिंपरी : प्रतिनिधी

'पेटा’ संस्थेच्या विरोधात केलेल्या बैलगाडा मालकांच्या आंदोलनाला यश आले आहे. ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्याचे महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत, अशी माहिती  आमदार महेश लांडगे यांनी दिली. 

बैलगाडा शर्यतींना ‘पेटा’ संस्था आणि ढोंगी प्राणिमित्र जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर  राज्यव्यापी आंदोलन केले होते. महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील ‘पेटा’च्या कार्यकर्त्यांची नियुक्ती रद्द करण्याची आंदोलकांची मागणी होती. 

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सक्षम कायदा केला आहे. शर्यती सुरू होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, ‘पेटा’ संस्था त्यामध्ये खोडा घालत आहे, असा आरोप बैलगाडा मालकांनी केला होता. ‘पेटा’ संस्थेचे कार्यकर्ते जयसिंहा यांचे  महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळारावरील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. 

आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा मालकांनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभागाचे मंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. आमदार लांडगे यांनी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील ‘पेटा’च्या जयसिंहा यांचे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. मंत्री जानकर यांनी त्वरित जयसिंहा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे मान्य केले आणि सदस्यत्व रद्द करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. 

राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला. त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली. तो कायदा अमलात येणार होता. ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने तयार केलेला कायदा जाणून घेणे गरजेचे होते. कायदा वाचला असता, तर त्यांना देखील समाधान वाटले असते; परंतु त्यांना बैलगाडा शर्यतीमध्ये पडण्याची काय गरज आहे. ‘पेटा’ संस्थेबाबत शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ‘पेटा’ संस्था केवळ कागदी घोडे नाचवीत आहे. संस्थेला मिळालेल्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जात आहे. ‘पेटा’ संस्थेचे  कार्यकर्ते जयसिंहा यांचे  महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आमदार  लांडगे म्हणाले.

Tags :