होमपेज › Pune › ‘पीसीसीओईआर’मध्ये 149 कॉपीराईट्सची नोंद

‘पीसीसीओईआर’मध्ये 149 कॉपीराईट्सची नोंद

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 17 2018 12:47AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे एकाच वेळी 149 कॉपीराईट्सची नोंदणी करण्यात आली. एका दिवसात सगळ्यात जास्त कॉपीराईट्स नोंदवण्याचा राष्ट्रीय विक्रम महाविद्यालयाने केला आहे. 

याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनच्या संगणक विभागाचे प्रमुख यू. व्ही. कोकाटे, तंत्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक आर. पी. गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलसचिव प्रमोद भडकवडे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, पीसीईटीचे ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेलचे डीन प्रा. शीतलकुमार रवंदळे, संयोजिका प्रा. अर्चना चौगुले आदी उपस्थित होते. 

कोकाटे म्हणाले, पीसीसीओईआरने नावीन्यपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन केले आहे. नावीन्यपूर्ण संशोधन, कल्पना यांची मांडणी केल्यानंतर त्यांची नोंद करणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा विचार करता या पुढील काळात अधिकाधिक संशोधक, तंत्रज्ञ, उत्कृष्ट शिक्षक, चांगल्या शैक्षणिक संस्थांची गरज भासणार आहे. 

युवा पिढीकडे नावीन्यपूर्ण संकल्पनांचा भरपूर साठा आहे. त्यांनी आपल्या संकल्पनांवर काम करून त्या समाजापुढे आणण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातूनच आपला देश अधिक प्रगती करू शकेल. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना अधिक प्रामाणिक असावे, भरपूर परिश्रम घ्यावे, यातूनच आपल्याला यश प्राप्त होते. 

कार्यक्रमामध्ये पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, विश्‍वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्य तिवारी यांनी कॉपीराईट उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. या माध्यमातून एकाच वेळी महाविद्यालयातील अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध रचना, संकल्पना, आरेखन यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येते. असा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रथमच होत असून, याची नोंद बुक ऑफ इंडिया रेकॉर्ड्सने घेतली असल्याचे प्राचार्य तिवारी यांनी सांगितले. 

प्रा. मानसी कुरकुरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अर्चना चौगुले यांनी आभार मानले.