Thu, Apr 25, 2019 12:10होमपेज › Pune › पालिकेच्या सेवा होणार ‘आउटसोर्स’

पालिकेच्या सेवा होणार ‘आउटसोर्स’

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 12:33AMपुणे  : ज्ञानेश्‍वर भोंडे

रक्‍तचाचणी व इतर सर्व निदान सेवा महापालिकेने त्रयस्थ संस्थेला चालवण्यासाठी (आउटसोर्स) देण्यात आल्या असून, येत्या 11 तारखेपासून शहरातील 46 दवाखान्यांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. ही निदान सेवा (लॅब) महापालिकेने ‘क्रस्ना डायग्‍नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेसोबत सांमजस्य करार करून दहा वर्षांसाठी चालविण्यास दिली आहे. येथील चाचण्यांचे दर हे ‘सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम’ (सीजीएचएस) ने ठरवलेल्या दरांपेक्षा सहा टक्के कमी असणार आहेत. पण सध्याच्या महापालिकेच्या दरांपेक्षा हे दर महाग असतील. 

सध्या शहरात महापालिकेचे नायडू रुग्णालय, कमला नेहरू, असे एकूण सात निदान केंद्र (लॅब) आहेत. तेथे रक्‍ताच्या साधारणपणे 25 ते 30 प्रकारच्या प्राथमिक स्वरुपाच्या तपासण्या होतात. आउटसोर्स करण्यात आलेल्या लॅबमध्ये तपासण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. ‘सीजीएचएस’ चे दर हे खासगी सेवांपेक्षा सर्वसाधारणपणे 30 ते 40 टक्के कमी असतात. यामुळे नागरिकांना येथे कमी पैशांत चाचण्या उपलब्ध होणार आहेत. 

आउटसोर्स केलेल्या संस्थेची शहरातील महापालिकेचे दवाखाने आणि प्रसूतीगृहे मिळून 46 ठिकाणी कलेक्शन सेंटर्स असणार आहेत. या ठिकाणी नागरिकांना हव्या असलेल्या चाचण्या करण्यासाठी रक्‍ताचे नमुने देता येतील. कमला नेहरू हॉस्पिटल आणि कोथरुडच्या सुतार दवाखान्यात दोन लॅब बसविण्यात आल्या असून, कलेेक्शन सेंटरवरून जमा झालेले रक्‍त नमुन्यांची या लॅबमध्ये चाचणी केली जाणार आहे. त्यांचा रिपोर्ट हा 24 तासांतच नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या सर्व सेवांसाठी लागणारे मनुष्यबळ, तपासण्यांची उपकरणे, वीज बिल  ही सर्व संस्थेची असणार आहेत. तर महापालिकेची जागा आणि पाणी त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक, गर्भवतींंना मोफत सेवा

या नवीन लॅबद्वारे आजी- माजी नगरसेवक, महापालिकेचे आजी माजी कर्मचारी-अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि एक वर्षाच्या आतील बालक यांच्या मोफत चाचण्या होणार आहेत. 

घरपोच सेवाही उपलब्ध

ज्येष्ठ नागरिकांना किंवा ज्या नागरिकांना रक्‍ततपासण्या करण्यासाठी दवाखान्यांत जाता येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी घरपोच सेवादेखील सूरू करण्यात येणार आहे. या सुविधेसाठी त्यांना 75 रुपये अतिरिक्‍त द्यावे लागणार आहेत. त्यासाठी एक कॉल सेंटरचा क्रमांक सूरू करण्यात येणार आहे. 

महापालिकेची एकच लॅब राहणार चालू

प्रशासनाच्या मते सध्याच्या लॅब या प्राथमिक सेवा देतात मात्र मनुष्यबळकमी आहे. सध्या महापालिकेच्या सात लॅब असून त्या सर्व बंद करण्यात येऊन केवळ गाडीखाना येथेच एक लॅब सुरू राहणार आहे.  

लॅबचे कर्मचारी, अधिकारी नाराज

लॅबचे महापालिकेने आउटसोर्स केल्याने सध्या सात लॅबचे वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी मात्र नाराज झाले आहेत. त्यांच्या मते महापालिकेने निदान सेवांचे खासगीकरण केले असून, त्याद्वारे नागरिकांची लूट होणार आहे. तसेच त्यांचे समायोजन कसे करणार आणि काय काम देण्यात येणार याबद्दल त्यांना चिंता आहे.

 

Tags : pune, pune news, pune corporation, service, Outsource