Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Pune › बाहेरचा कचरा टाकला जातोय महापालिका हद्दीत

बाहेरचा कचरा टाकला जातोय महापालिका हद्दीत

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 04 2018 11:37PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हिंजवडी व परिसरातील कचरा महापालिका हद्दीमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टाकताना भाजपाचे नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी रविवारी (दि.2) रंगेहाथ पकडल्याने खळबळ माजली आहे. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरातील कचरा कुंड्या रात्रीच्या वेळी कचर्‍याने पूर्ण भरल्याचे लक्षात आल्यानंतर हा कचरा कोण टाकत आहे याबाबत शिंदे यांनी गस्त सुरू केली होती. त्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहेे.

प्रभाग क्रमांक 19 रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरात काही दिवसापासून कचराकुंड्या रात्रीनंतर अचानकपणे पूर्ण भरून ओसंडून वाहत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेवक शीतल शिंदे यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. त्यानंतर शिंदे यांनी याबाबत अभिजित डागलिया, सिद्धेश राक्षे, किरण जाधव, रोहन तापकीर, भूषण बंब, सूरज खेनत, शुभम वाल्हेकर, गणेश आचार्य यांना साथीला घेऊन दोन ते तीन दिवस गस्त घातली. त्या दरम्यान रविवारी (दि.2) रात्री साडेबारा वाजता प्‍लास्टिकच्या पिशव्यांत भरलेला कचरा घेऊन टेम्पो आला. त्यातील कचरा महापालिकेच्या कचराकुंड्यांत टाकताना टेम्पोतील लोकांना रंगेहाथ पकडले. 

याबाबत विचारणा केली असता हा कचरा हिंजवडी  परिसरातील हॉटेलमधील असल्याचे कचरा उतरणार्‍यांनी सांगितल्यानंतर नगरसेवक शीतल शिंदे यांनी संबंधित प्रकार ‘अ’ क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे महापालिका हद्दीत हद्दीच्या बाहेरच्या कंपन्या, हॉटेल व इतर ठिकाणचा कचरा आणून टाकण्यात येत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याने शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना धारेवर धरले.