Sun, Aug 25, 2019 08:46होमपेज › Pune › उद्दिष्ट 1400 कोटींचे; मिळाले 561 कोटी

उद्दिष्ट 1400 कोटींचे; मिळाले 561 कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीचा मोठा आर्थिक फटका महापालिकेला सहन करावा लागला आहे. चालू वर्षाच्या (2017-18) अंदाजपत्रकात बांधकाम परवाना शुल्कातून 1 हजार 400 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असताना, मार्चअखेरपर्यंत प्रत्यक्षात केवळ 561 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे; त्यामुळे महापालिकेला जवळपास 838 कोटींचा फटका बसला आहे.

महापालिकेच्या उत्पन्नामध्ये राज्य शासनाकडून स्थानिक संस्थांच्या कराच्या बदल्यात जीएसटीचे मिळणारे अनुदान, मिळकतकर आणि बांधकाम परवाना शुल्क अशा प्रमुख उत्पन्नांचा समावेश आहे. त्यात चालू वर्षात जीएसटी अनुदान आणि मिळकतकराच्या अपेक्षित उत्पन्नापर्यंत पालिकेने मजल मारली आहे; मात्र, बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे बांधकाम परवाना शुल्कात मोठा फटका बसला असल्याचे समोर आले, महापालिका प्रशासनाने चालू वर्षात बांधकाम परवानामधून 1 हजार 400 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले असतानाच प्रत्यक्षात मात्र केवळ 561 कोटी 46 लाख इतके उत्पन्न 28 मार्चअखेरपर्यंत जमा झाले आहे. त्यामुळे जवळपास 838 कोटी 54 लाखांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे गत दोन वर्षांत मिळालेल्या उत्पन्नाप्रमाणेच या वर्षीच्या उत्पन्नाचा आलेख राहिला आहे. 2016-17  या वर्षात 532 कोटी 97 लाख तर गतवर्षी 747 कोटी 30 लाखांचे उत्पन्न यातून मिळाले होते.
विकासकामांना फटका

बांधकाम परवाना शुल्क घटल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक गडगडले आहे. त्याचा फटका थेट विकासकामांना बसला आहे. त्यातच मेट्रो, नदी सुधारणा, समान पाणीपुरवठा योजना, असे मोठे प्रकल्प पालिकेने हाती घेतले आहेत, त्यांना निधी उपलब्ध करून देताना प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

Tags : Pune, Pune News, Out, Rs 1400 crores, Received, 561 Crore


  •