Mon, Jul 22, 2019 05:03होमपेज › Pune › येरवडा कारागृहात उमटले निरागस सूर 

येरवडा कारागृहात उमटले निरागस सूर 

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:43AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

रमणीय सायंकाळ..., मावळतीला झुकलेल्या सूर्याची तांबुस किरणे.., कार्यक्रमाची लगबग..., कारागृह परिसरात जमलेली कैद्यांची गर्दी..., इकबाल दरबारकडून चढलेला सुरांचा साज आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर गायनाने येरवडा कारागृहात उमटलेले निरागस सूर, अशा आनंदी वातावरणात प्रेरणा पथ कार्यक्रम रंगला.

येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि भोई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा पथ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गायक शंकर महादेवन यांनी एकापेक्षा एक सरस सादर केलेल्या सुमधुर गीतांनी बंदी बांधव मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या सादरीकरणाला कैद्यांनी टाळ्याच्या कडकडाटाबरोबरच शब्द स्वरांची देखील साथ दिली. यावेळी अप्पर पोलिस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलिस महासंचालक विठ्ठल जाधव, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, कारागृह अधीक्षक यु. टी. पवार, इकबाल दरबार, आवेज दरबार, जमीर दरबार व अन्य उपस्थित होते. 

मोरया, मोरया गणपती बाप्पा मोरया..., सूर निरागस हो..., गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही..., मन उधाण वार्‍याचे..., हर घडी बदल रही है धुप जिंदगी..., मैंने जिसे अभी अभी देखा है, कौन है वो अनजानी..., मेरे मन ये बता दे तू, कही और चला है तू, मितवा..., सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हम पे डालो, सबसे आगे होगे हिंदूस्तानी..., तारे जमीन पर चित्रपटातील मेरी मॉ..., यासारखी एकापेक्षा एक सरस गाजलेली गीते सादर करत शंकर महादेवन यांनी कैद्यांसह मान्यवरांची मने जिंकली. तसेच इकबाल दरबार ऑर्केस्ट्राच्या कलाकारांनीही सुमधुर गीते पेश केली. कार्यक्रमादरम्यान कलाकारांसह कारागृहातील कैद्यांसह पोलिस कर्मचार्‍यांनी सुद्धा विविध गाणी सादर केली.

यावेळी डॉ. उपाध्याय म्हणाले, येरवडा कारागृहातील कैदी कलाप्रेमी आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी कारागृहाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. यावेळी जेलमधील सुमारे दीड हजार कैद्यांनी त्यांच्यासमोर उत्कृष्टरित्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे खुप कौतुक केले होते.