Fri, Jul 19, 2019 05:34होमपेज › Pune › दादा कोंडकेंनी चित्रपटसृष्टी जगवली : सुधीर गाडगीळ

दादा कोंडकेंनी चित्रपटसृष्टी जगवली : सुधीर गाडगीळ

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 12:03AMपुणे : प्रतिनिधी

पत्रकार म्हणून मी दादा कोंडके यांच्या अधिक जवळ गेलो, ते नंतर राजकारणात गेल्यानंतरही त्याच आपुलकीने माणसांची चौकशी करायचे. आचार्य प्र. के अत्रे आणि पु. ल देशपांडे यांच्यानंतर प्रचंड ऊर्जा, कलेबद्दल आणि त्याचबरोबर समाजाबद्दलही कणव असलेला कलाकार म्हणजे दादा कोंडके. त्यांच्यासारखा नट आणि माणूस पुन्हा होऊ शकत नाही. त्यांनी केवळ मराठी माणसांचे मनोरंजनच केले नाही तर मराठी चित्रपटसृष्टी जगवली, असे मत ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.

शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान, दादा कोंडके मित्र परिवार आणि दादा कोंडके प्रॉडक्शन्सतर्फे दादा कोंडके गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम शिर्के, मंगेश ठाणगे, अ‍ॅड. एकनाथ जावीर उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींना गाडगीळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ज्येष्ठ लावणी नृत्यांगना राजश्री काळे-नगरकर यांना सामाजिक गौरव पुरस्कार, गडकिल्ले संवर्धक अ‍ॅड. मारुती गोळे आणि स्माईल फौंडेशनचे योगेश मालखरे यांना सांस्कृतिक गौरव, आंतरराष्ट्रीय कराटेपटू वैष्णवी मांडेकर यांना क्रीडा गौरव आणि लक्ष्मण माने यांना तंत्रज्ञगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.

मेघराज राजेभोसले म्हणाले, दादा कोंडके हे अनेकदा विनोदी कलाकार म्हणून जगाला माहिती आहे, ते चांगले शाहीर आणि लेखक होते, त्यांची ही बाजू नवीन पिढीसमोर नेली पाहिजे. तसेच, त्यांनी माणूस म्हणून केले सामाजिक कामही आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र गोळे यांनी केले.