Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Pune › ‘दगडूशेठ’ बाप्पांना शहाळ्यांचा गारवा

‘दगडूशेठ’ बाप्पांना शहाळ्यांचा गारवा

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकर्‍यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने दूर व्हाव्यात, या सद्भावनेने दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त आयोजित शहाळे महोत्सवात तब्बल पाच हजार शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. नारळाची प्रतिकात्मक झाडे आणि शहाळ्यांनी सजविलेला मंदिराचा परिसर पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. अक्कलकोटचे अ‍ॅड. रवींद्र खैराटकर यांनी गणपती बाप्पांना हा महानैवेद्य अर्पण केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह विश्‍वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. 

अशोक गोडसे म्हणाले, वैशाख पौर्णिमेदिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. शेतकर्‍यांच्या समस्या दूर  व्हाव्यात, या सद्भावनेने दरवर्षी हा महानैवेद्य अर्पण करण्यात येतो. शहाळ्यांचा हा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.