Sat, Mar 23, 2019 18:17होमपेज › Pune › संघटना कामगारांच्या प्रगतीसाठीच हव्यात

संघटना कामगारांच्या प्रगतीसाठीच हव्यात

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 12:40AMपिंपरीः परदेशात कामगार संघटना संप करत नाहीत, तर काळ्या फिती लावून काम करतात. आपल्याकडे डाव्या कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे अनेक कारखाने बंद झाले असून  उत्पादन थांबले आहे, असे होता कामा नये. कामगार संघटनांनी कामगार हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी काम करावे,  असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले. पिंपरी -चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघातर्फे थेरगांव येथे उभारण्यात येणार्‍या कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचे भूमिपूजन  पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले.  त्या वेळी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. यावेळी खासदार  श्रीरंग बारणे, अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष  आमदार लक्ष्मण जगताप, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड,  विरोधी पक्षनेते दत्ता साने,  कर्मचारी महासंघाचे  अध्यक्ष  बबनराव झिंजुर्डे,  अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, नगरसेवक कैलास बारणे,  झामाताई बारणे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले, चांगल्या पद्धतीने कामगार संघटना चालवणे अवघड आहे. कारण कामगारांच्या अनेक मागण्या असतात .दुसरीकडे प्रशासनाची कायद्याची बंधने असतात.  त्यातून मार्ग काढावा लागतो. खा.साबळे म्हणाले, ज्या कामगारांच्या बळावर महापालिका व हे शहर उभे आहे. त्या कामगारांच्या आनंदाचा आलेख उंचावत नाही तोवर श्रीमंत पालिका या संकल्पनेस अर्थ नाही. कामगारांकडून शासनाकडे येणारा पैसा त्यांच्या कल्याणासाठी खर्च व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली

आ. जगताप म्हणाले,  कै. शंकर गावडे यांनी केवळ पिंपरी - चिंचवड महापालिकेतीलच नव्हे तर राज्यातील पालिका कर्मचार्‍यांचे नेतृत्व केले.  त्यांच्या नावाने कामगार भवन उभारणे स्त्युत आहे.  खा बारणे , आ. चाबुकस्वार यांचीही या वेळी भाषणे झाली.  कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी महापालिकेतील रिक्तपदे भरली जात नाहीत, मानधनावर कर्मचारी घेतले जातात अशी खंत  व्यक्त केली. घटागाडी कर्मचार्‍यांचा प्रश्न, पीएमपी कर्मचार्‍यांच्या केलेल्या बदल्या याचाही त्यांनी उल्लेख केला. 

पुढील आठवड्यात बैठक

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील कामगारांच्या विविध  प्रश्नावर पुढील आठवड्यात आयुक्तांसमवेत बैठक घेऊ असे, आश्वासन यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.