Wed, Apr 24, 2019 07:37होमपेज › Pune › फुल खिले है गुलशन गुलशन..!

फुल खिले है गुलशन गुलशन..!

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:31AMयेवला : प्रतिनिधी

घेतलेल्या शिक्षणाचा व त्याद्वारे आलेल्या अनुभवाचा वापर योग्य पद्धतीने केला तर काहीही शक्य होते. पदवीनंतर एमबीएची पदवी मिळवत एका कंपनीसाठी गावोगाव मार्केंटिंगचे काम करणार्‍या युवकाने मामाच्या शेतीत बाजारात जोरदार  मागणी असलेल्या गुलाबाची तंत्रशुद्ध व सेंद्रिय पद्धतीने शेती फुलवत भरघोस उत्पन्‍नाचा मार्ग शोधला आहे.

येवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव शिवारामध्ये नाशिक - औरंगाबाद राज्यमहामार्गालगत विठ्ठलराव नरोडे यांच्या वस्तीवर राहणारा युवक रोहित आढाव याने नरोडे यांच्या शेतीतच सेंद्रिय पद्धतीने एक एकर गुलाबाची शेती सुरू केली आहे. आपल्या परिसरामध्ये गुलाबाची मागणी आहे. पण पुरवठा कमी असल्याचे हेरले अन् गुलाब शेती करण्याचे ठरवले. त्यासाठी गुलाब शेतीचा पूर्ण अभ्यास करत व मार्केटिंग करताना आलेल्या अनुभवाच्या आधारे त्याने आजोबा व मामांशी चर्चा करून जुलै 2017 मध्ये त्यांच्याच एक एकर क्षेत्रावर 3 बाय 7 फूट अंतरावर एक फूट खोल खड्ड्यांमध्ये शेणखत, सेंद्रिय खत टाकत एकूण 1800 गुलाब रोपांची लागवड केली. एका रोपासाठी 14 रुपये असे एकरी 25 हजार रुपये फक्त गुलाब रोपांसाठी त्याचा खर्च झाला तर ठिबक सिंचनसाठी 20 हजार, फवारणी 23 ते 24 हजार, मशागतीसाठी काही असा सुमारे 1 लाख रुपयांच्या आसपास खर्च गुलाबासाठी केला.

लागवडीच्या वेळीस शेणखत व सेंद्रिय खते दिली. तसेच, पाण्याची सोय म्हणून ठिबक सिंचन यंत्रणेचा वापर केला. याच ठिबकद्वारे शेणखताचा अर्क सेंद्रिय खते, गोमूत्र, ताक, शेण व सेंद्रिय पदार्थ वापरून तयार केलेले विद्राव्य खते देण्यासाठी वेंचुरीचा वापर करीत थेट रोपांच्या मुळापर्यंत सेंद्रिय खते पोहचवली. ठिबक सिंचन व सेंद्रिय खते व निमार्क या सेंद्रिय औषधीचा वापर केल्याने रासायनिक खते व औषधांच्या तुलनेत त्याला अवघा 20 ते 30 टक्के खर्च आला. रोहितच्या मामाकडे असलेल्या देशी व खिलार गायींमुळे शेणखत गोमूत्रासाठी त्याला कुठेही फिरावे लागले नाही.