Thu, Apr 25, 2019 16:16होमपेज › Pune › सहा गावातील वनजमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश

सहा गावातील वनजमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:46AM

बुकमार्क करा

पुणे : महेंद्र कांबळे

वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने डुडुळगाव, बुरकेगाव, लोणीकंद, फुलगाव, भावडी आणि डोंगरगाव या गावांमधील वन खात्याच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, वन खात्याचे मुख्य सचिव यांना दिले होते. याबाबत वन खात्याने न्यायाधिकरणाच्या आदेशाची गंभीर दखल घेतली असून, लवकरच ही अतिक्रमणे  हटविण्यात येणार आहे.  

पुणे येथील याचिकाकर्ते रमेश आरगे यांनी   मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, वन खात्याचे मुख्य सचिव, शिवकल्पना स्टोन क्रशर कंपनी, प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या वन जमिनींवरील अतिक्रमणामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याची बाब रमेश आरगे यांच्या लक्षात आली होती. 

त्यानुसार त्यांनी मिळविलेल्या माहितीनुसार  डुडुळगाव तसेच अन्य ठिकाणी वन खात्याच्या जमिनीवर दगड खाण, तसेच आरसीसीमध्ये केलेले बांधकाम, घरे बांधण्यात आली आहेत; त्यामुळे अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आरगे यांनी केल्यानंतर ‘एनजीटी’ने वन खात्याच्या जमिनीवर बुरकेगाव, डुडुळगाव, लोणीकंद, फुलगाव, भावडी आणि डोंगरगाव येथील अतिक्रमणे काढण्याचे आदेश आहेत. परंतु, ही अतिक्रमणे अद्याप काढण्यात आली नाहीत. 

एनजीटीने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना वन खात्याच्या वतीने अतिक्रमण करणार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याला उपवनसंरक्षकांनीही दुजोरा दिला आहे.