Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Pune › विद्यार्थ्यांकडून ईबीसी शिष्यवृत्तीची रक्‍कम न घेण्याचे आदेश

विद्यार्थ्यांकडून ईबीसी शिष्यवृत्तीची रक्‍कम न घेण्याचे आदेश

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी 

आर्थिक दुर्बल घटकांमधील (ईबीसी) विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना महाविद्यालयांमध्ये शिक्षण शुल्काची त्यांच्या हिश्श्यात येणारी केवळ 50 टक्के रक्कम येत्या शैक्षणिक वर्षापासून भरावी लागणार आहे. त्यामुळे प्रवेश घेताना 100 टक्के शुल्क भरण्याचा तगादा लावणार्‍या महाविद्यालयांच्या त्रासापासून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना बुधवारी दिले आहेत. 

राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर त्यांना संबंधित शैक्षणिक वर्षाचे 100 टक्के शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जातो. तर, शुल्क पूर्ण न भरल्यास प्रवेश नाकारण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. दरवर्षी, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शुल्क पूर्ण भरण्याच्या कारणावरून पालक आणि महाविद्यालय प्रशासनामध्ये वाद उद्भवतात. त्यामुळे याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी निर्णय घेत आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांनी एकूण शुल्काच्या केवळ 50 टक्के त्यांच्या हिश्श्यातील रक्कम महाविद्यालयाला भरावी लागणार असल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या बॅकेच्या खात्यात उर्वरित 50 टक्के शुल्काची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) जमा करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ती रक्कम महाविद्यालयांना द्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने पुण्यासह नगर आणि नाशिक जिल्ह्यांमधील संलग्नित महाविद्यालयांना दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याकडे पूर्ण शुल्क भरण्याचा तगादा लावल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिला आहे. एखादे महाविद्यालय विद्यार्थ्याला पूर्ण शुल्क न भरल्याने प्रवेश नाकारात असल्यास त्या महाविद्यालयाची तक्रार विद्यार्थ्याला उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडे करता येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळी महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.