Mon, Apr 22, 2019 16:33होमपेज › Pune › उच्च शिक्षण विभागाचा विद्यापीठाला दणका

उच्च शिक्षण विभागाचा विद्यापीठाला दणका

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 1:11AMपुणे : लक्ष्मण खोत

राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत अत्यंत नगण्य प्रमाणात माहिती अधिकारी नियुक्ती करणार्‍या आणि माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अमलबजावणी न करणार्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला उच्च शिक्षण विभागाने चांगलाच दणका दिला आहे. विद्यापीठाला विभागनिहाय माहिती अधिकारी नियुक्ती करण्याचे आदेश पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी दिले आहे. विद्यापीठात फक्त दोनच माहिती अधिकारी असल्याचे सर्वप्रथम दै. पुढारी ने 29 जुलै 2017 रोजी वृत्त देत उजेडात आणली होती.

माहिती अधिकारी कायद्यानुसार जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी इ. विविध अधिकार्‍यांची नेमणूक करणे अपेक्षित होते. राज्यातील इतर विद्यापीठांद्वारे  ही नेमणूक करण्यात आली आहे. पण पुणे विद्यापीठाने या कायद्याला कोलदांडा दाखवत सरळ सेवेतून दोन माहिती अधिकारी पदांची निर्मीती केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते परशुराम वाघमोडे यांनी उजेडात आणले होते. एवढेच नाही तर कुलसचिवांकडून माहिती अधिकार कायद्याच्या  अंमलबजावणीसाठी दरमहा 6 हजार स्वतंत्र मानधन घेण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. एकूण यासंदर्भात वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. 

उच्च शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेत विद्यापीठाला त्वरीत विभागनिहाय माहिती अधिकारी नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार विद्यापीठ हे सार्वजनिक प्राधिकरण असल्याने कायद्यातील दुसर्‍या प्रकरणातील कलम 5(1) व (2) नुसार विद्यापीठातील सर्व विभागामध्ये आणि कार्यालयांमध्ये माहिती अधिकारी नेमणे अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यापीठाने जास्तीत जास्त अधिकार्यांना माहिती अधिकारी म्हणून नियुक्त करावे, असा आदेश पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी दिले आहेत.

विद्यापीठात 65 विविध शैक्षणिक विभाग, 46 तदर्थ अभ्यासमंडळे, 19 अध्यासने व 53 विविध प्रशासकीय कार्यालये आहेत. यामध्ये अंदाजे 1500 कर्मचारी काम करत असून विद्यापीठाला 705 संल्गन महाविद्यालये आहेत. विद्यापीठातून अंदाजे 7 लाख विद्यार्थी दर वर्षी शिकत असतात. त्यामुळे विद्यापीठाने विभागनिहाय माहिती अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात येत होती. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने 86, कोल्हापूर विद्यापीठाने 89, सोलापूरने 32, नांदेडने 30, गोंडवनाने 20, औरंगाबादने 82, नागपूरने 192, जळगावने 46, अमरावतीने 76 जनमाहिती अधिकार्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता पुणे विद्यापीठ विभागनिहाय माहिती अधिकार्यांची नेमणूक कधी करतेय पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.