Sun, May 26, 2019 01:01होमपेज › Pune › ग्रामसेवकांना गावातच थांबण्याचे विभागीय आयुक्‍तांचे आदेश

ग्रामसेवकांना गावातच थांबण्याचे विभागीय आयुक्‍तांचे आदेश

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी

ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कामातील विस्कळीतपणा कमी व्हावा; तसेच ग्रामस्थांचे ग्रामसेवकाला भेटण्यासाठी होणारे हेलपाटे कमी करण्यासाठी आता ग्रामसेवकांना सकाळी नऊ ते सायं. पाच वाजेपर्यंत गावातच थांबण्याचे आदेश विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत.

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये हा आदेश लागू करण्यात आला आहे़  तसेच पंचायत समितीसाठी सुधारित नियमावलीही दळवी यांनी लागू केली आहे़  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांच्या कामाचा दिवस व पंचायत समितीच्या भेटीचा दिवस, याचा फलक तयार करून तो ग्रामपंचायतीमध्ये दर्शनी भागावर ग्रामसेवकाने लावायचा आहे़  त्यामुळे ग्रामसेवक कोणत्या दिवशी उपलब्ध होणार आहेत हे ग्रामस्थांना समजणार आहे़ 

दळवी म्हणाले, यापुढे आता राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावरील विविध अधिकारी एका एका विषयासाठी ग्रामसेवकांच्या वारंवार बैठका आयोजित करतात; त्यामुळे ग्रामपंचायत कामकाजासाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही़  त्यामुळे गटविकास अधिकार्‍यांनी पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या सोमवारीच ग्रामसेवकांची आढावा सभा आयोजित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या बाबत सकारात्मक दृष्टिकोनात वाढ व्हावी, यासाठी ही सर्व नियमावली तयार करण्यात आली आहे़ 

तसेच दोनपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर असणार नाही याचीही काळजी नवीन नियमावलीत घेण्यात आली आहे़  नवीन नियमावलीबाबत अधिक माहिती देताना दळवी म्हणाले, ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज सुरू होईपर्यंत ग्रामीण भागात शेतकरी, नागरिक व शेतमजूर हे कामासाठी सकाळीच बाहेर पडतात. पर्यायाने ग्रामसेवकाच्या भेटीअभावी कामे रखडतात़  त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ शेतात जाण्यापूर्वी त्यांना ग्रामपंचायतीतील कामासाठी येता यावे म्हणून शासकीय कामकाज  सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत असणार आहे़