Wed, Feb 20, 2019 23:28होमपेज › Pune › सहावीत नापास केलेल्या विद्यार्थ्याला आठवीत प्रवेश देण्याची सूचना

हॅचिंग्स स्कूलवर कारवाईचे आदेश

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी 

शिक्षण हक्क कायद्याला हरताळ फासत एका विद्यार्थ्याला सहावीमध्ये नापास केल्याप्रकरणी हॅचिंग्स स्कूलच्या मुख्याध्यापकावर कारवाई करावी. तसेच संबंधित विद्यार्थ्याला आरटीई अ‍ॅक्टनुसार इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश द्यावा, असा आदेश शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकार्‍यांना दिला आहे. 

आरटीई कायद्याअंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे बंधनकारक असताना शहरातील हॅचिंग्स स्कूलद्वारे शिक्षण हक्क कायद्याला हरताळ फासत विद्यार्थ्याला इयत्ता सहावीत गेल्या वर्षी नापास केले होते. याविरोधात शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार देऊनही शाळा प्रशासनाविरोधात कारवाई करण्यास शिक्षण विभाग टाळाटाळ करत आहे. दरम्यान, दै. ‘पुढारी’मध्ये ‘हॅचिंग्स स्कूलचा शिक्षण हक्क कायद्याला हरताळ’ या नावाने वृत्त प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाला जाग आली असून हॅचिंग्स स्कूलच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करत विद्यार्थ्याला आरटीई अ‍ॅक्टनुसार इयत्ता आठवीमध्ये प्रवेश देण्यात यावा, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिला आहे.  

हॅचिंग्स स्कूलमध्ये माझी दोन्ही जुळे मुले शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये इयत्ता 6 वीत शिकत होती. मात्र, शाळेने गत वर्षी मुलाला नापास केले, तर मुलीला पास करत पुढील वर्गात प्रवेश दिला. त्यानंतर शाळा प्रशासनावरोधात शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार करुनही अद्याप माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही. शाळा प्रशासन शिक्षण विभागाच्या आदेशाला जुमानत नसल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे आता तरी शाळेवर कारवाई करुन माझ्या मुलाला यावर्षी इयत्ता आठवीमध्ये प्रवेश मिळावा, हीच शिक्षण विभागाकडे माझी मागणी आहे.  -पालक.