Sat, Jul 20, 2019 15:24होमपेज › Pune › पुणे विभागामध्ये अवघे ८० हजार ‘तळीराम’

पुणे विभागामध्ये अवघे ८० हजार ‘तळीराम’

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 12:23AM

बुकमार्क करा
पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

राज्य आरोग्य विभागाने एक डिसेंबरपासून सुरू केलेल्या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत आतापर्यंत तब्बल 14 लाख 67 हजार दारूचे व्यसन असलेले नागरिक आढळून आले आहेत. 14 लाखांपैकी सर्वाधिक दारूचे व्यसनी राज्यात नागपूर विभागात सापडले असून, त्यांची संख्या चार लाख 41 हजार इतकी आहे, तर सर्वात कमी पुणे विभागात सापडले असून, त्यांची संख्या 80 हजार इतकी आहे. 

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘मौखिक आरोग्य तपासणी’ राज्यातील अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, लातुर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या आठ आरोग्य परिमंडळांमध्ये संपूर्ण डिसेंबर महिना ही मोहीम सुरू राहणार आहे.  या मोहिमेद्वारे  राज्यातील ठराविकजिल्ह्यातील शहरात व गावांत आशा, आरोग्य कर्मचारी यांच्याद्वारे घरोघरी जाऊन तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणार्‍या 30 वर्षांपुढील सर्व व्यक्तींची मुख स्वास्थ्य तपासणी करण्यात येत आहे; तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय येथे आलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांचीदेखील मुखरोग तपासणी करण्यात येत आहे. 

यामध्ये तोंडाविषयी काही त्रास असल्यास, त्यांना कोणत्या सवयी आहेत याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार त्या नागरिकाला तंबाखू व्यसनी, दारूचे व्यसनी, मुख स्वच्छ, मुख अस्वच्छ, पांढरे चट्टे आदी प्रकारामध्ये वर्गवारी केली जात आहे. त्याचबरोबर त्यांचे समुपदेशनही केले जाते. 

एक डिसेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत 27 डिसेंबरपर्यंत राज्यातील एक कोटी 52 लाख स्त्री व पुरुषांची तपासणी केली. त्यापैकी 14 लाख 67 हजार नागरिकांना दारूचे व्यसन असल्याची नोंद केली आहे. यामध्ये अकोला (विभाग) एक लाख 65 हजार, औरांगाबाद- 84 हजार, कोल्हापूर- एक लाख 15 हजार, लातूर- एक लाख 44 हजार, नागपूर- चार लाख 41 हजार, नाशिक- दोन लाख 7 हजार, पुणे- 80 हजार आणि ठाणे- एक लाख 62 हजार इतके तळीराम सापडले आहेत.