Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Pune › यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला निधी देण्यास विरोध

यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला निधी देण्यास विरोध

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 29 2018 11:01PMपिंपरी : प्रतिनिधी 

कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला तब्बल 5 कोटी रुपये थेट पद्धतीने अनुदान देण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. नोंदणीकृत नसलेल्या एका स्वयंघोषित संघटनेला इतका मोठा निधी देण्यास भाजपचे भोसरी विधासभा मतदारसंघाचे माजी कार्याध्यक्ष सचिन काळभोर यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि ‘आपलं सरकार’ यावर तक्रार दाखल केली आहे. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी न करता ‘वायसीएम’ रुग्णालयात निवारा उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

समितीमार्फत प्राधिकरण, निगडी येथे कै. यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. यामध्ये गोरगरीब, अनाथ व अपंगासाठी अभ्यासिका, वसतिगृह, सांस्कृतिक भवन, ग्रंथालय, वाचनालय, व्यायामशाळा, आयुर्वेदिक उपचार केंद्र, कॉन्फरन्स हॉल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे आर्थिक मदत करण्याची विनंती समितीने केली होती. त्यानुसार पालिका 5 कोटी रुपयांची मदत करणार असून, त्याला स्थायी समितीने 16  मे रोजी आणि सर्वसाधारण सभेने 20 जूनला मंजुरीही दिली आहे. 

याबाबत भाजपचे काळभोर यांनी एका खासगी व धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणी नसलेल्या स्वयंघोषित समितीला थेट पध्दतीने तब्बल 5 कोटी रुपये निधी देण्यावर आक्षेप नोंदविला आहे. पालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय उभारले आहे. त्या रुग्णालयातून शहरासह आसपासच्या नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. तेथील रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यास व आराम करण्यास प्रशासनाने कोणतीही सोय केलेली नाही. तो निधी समितीला न देता त्या रकमेतून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी सुसज्ज इमारत उभी करावी. तसेच, रुग्णालयात आणखी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, पालिकेला थेट 3 लाख रुपयांचा निधी अनुदान व सहाय्य म्हणून देता येते. ही रक्कम अधिक असल्याने त्यासाठी राज्य शासनाची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच हा निधी पालिकेस अदा करता येणार आहे, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. 

समिती 1990 ची नोंदणीकृत आहे

कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समिती ही 1990 ला नोंदणी झालेली संघटना आहे. त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतरच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जागा दिली आहे. तसेच, बांधकामांचा प्लॅन मंजूर केला आहे. सर्व कागदपत्रे तपासूनच पिंपरी-चिंचवड महापालिकेने 5 कोटी निधी देण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे मुख्यमंत्र्यांकडेही सादर केली आहेत. सदर तक्रार खोटी व बिनबुडाची आहे, असे यशवंतराव चव्हाण स्मारक समितीचे सुनील जाधव यांनी सांगितले.