होमपेज › Pune › महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी नाना काटे?

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी नाना काटे?

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:37PM



पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड पालिकेतील विरोधी पक्षनेते बदलाच्या हालचालींनी चांगलाच वेग घेतला आहे. ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, अजित गव्हाणे यांची नावे चर्चेत असतानाच, आता नाना काटे यांचे नाव पुढे आले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाय रोवण्याच्या दृष्टीने  नाना काटे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते.

जगताप यांना राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेची आमदारकी असे भरभरून दिले; मात्र तरी त्यांनी लोकसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून शेकापतर्फे रिंगणात उडी घेतली. त्या निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभेला विजयाचे गणित मांडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले. त्यांना 1 लाख 23 हजार 786 मते मिळाली, तर शिवसेनेचे राहुल कलाटे यांना 63 हजार 489 आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी आज स्पर्धेत असलेले  राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 42 हजार 553 मते मिळाली. या विजयानंतर जगताप यांच्याकडे भाजपचे शहराध्यक्षपदही आले.

जगताप यांनी राष्ट्रवादी सोडल्याची खंत पक्षाला आहे, त्यामुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पाय रोवून जगताप यांना आव्हान देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांची पालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पालिका स्वीकृत सदस्यपदी वर्णी लावण्यात आली. सांगवीतील प्रशांत शितोळे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. स्थायीचे माजी सभापती शितोळे हे आमदार जगतापांचे एकेकाळचे समर्थक होते; मात्र मागील निवडणुकीत जगताप यांनी शितोळे यांच्याऐवजी हर्षल ढोरे यांना ताकद दिल्याने शितोळे जगताप यांच्यापासून दुरावले. विधानसभा निवडणुकीला त्यांनी राष्ट्रवादीची पाठराखण केली म्हणूनच सन 2017 च्या पालिका निवडणुकीत शितोळे यांनी बंडखोरी करूनही त्यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

त्यांची नियुक्ती हा चिंचवड विधनसभा मतदारसंघात पाय रोवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यापाठोपाठ आता महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी नाना काटे यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर घणाघाती आरोप केले. आमच्यातील कोणी भाजपशी आतून हातमिळवणी करत असतील, तर पक्षश्रेष्ठी त्यांची गय करणार नाहीत, असा इशारा दिला. पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद योगेश बहल यांना एक वर्षासाठीच दिले होते, असे सांगत लांडे यांनी विरोधी पक्षनेते बदलाचे संकेत दिले. त्यानंतर विरोधी पक्षनेते बदलाच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

महापालिका निवडणुकीनंतर योगेश बहल यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती होताच संताप व्यक्त करत बंडाचा इशारा दिलेले ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने; तसेच माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक महापालिका स्थायीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांची नावे चर्चेत असतानाच आता लोकसभा, विधानसभा निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांचे नाव पुढे आणण्यात आले आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीत चाललेले राजकारण आणखी काय काय वळणे घेते याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

सत्तेच्या समतोलाचा प्रयत्न

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नाना काटे पुन्हा इच्छुक आहेत; मात्र भाऊसाहेब भोईर  अथवा प्रशांत शितोळे  यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यास काटे नाराज होऊ नयेत यासाठी त्यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन सत्तेचा समतोल साधण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे;  मात्र विरोधी पक्षनेतेपदासाठी तीव्र इच्छुक दत्ता साने यांचे काय, असा प्रश्न भोसरी विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.