Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Pune › ...म्हणून नानांचा पत्ता कापून काकांना विरोधी पक्षनेतेपद

...म्हणून नानांचा पत्ता कापून काकांना विरोधी पक्षनेतेपद

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:18AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

योगेश बहल यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याजागी चिंचवड मतदारसंघातील नाना काटे यांची नियुक्ती निश्चित मानली जात होती. मात्र, हा मतदारसंघ भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असल्याने तेथे ताकद देऊन दगडावर डोके आपटण्याऐवजी भोसरीवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. ‘मवाळ’ प्रतिमाही काटे यांना भोवली. ‘हल्लाबोल’ आंदोलनाचा टेम्पो  टिकवून ठेवण्यासाठी पक्षाने दत्ता (काका)साने या आक्रमक चेहर्‍यास संधी दिली.

महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. भाजपने सत्ता संपादन केली. राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला. विरोधी पक्षनेतेपदी स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते, महापौर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद भूषविलेल्या योगेश बहल यांना संधी दिल्याने या पदासाठी  इच्छुक दत्ता साने यांनी संताप व्यक्त केला. त्याच त्याच व्यक्तींना पदे दिली जात असल्याने पक्षाचे नुकसान होत आहे असे सांगत त्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला. नंतर हे वादळ शांत झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन विरोधी पक्षनेत्यासाठी  मोठे दालन द्यावे या मागणीसाठी संघर्ष करण्यात बहल यांचा वेळ वाया गेला. महापौर कार्यालयाबाहेर खुर्ची टाकून ते बसत. शेवटी नेहमीसाठी सध्याचे कार्यालय व पक्ष नगरसेवकांच्या बैठकीसाठी स्थायी समिती सभागृह या फॉर्म्युल्यावर त्यांची बोळवण करण्यात आली.

योगेश बहल हे सभागृहात भाजपला पाहिजे तसा विरोध करत नाहीत, अशा तक्रारी वाढल्यामुळे राष्ट्रवादीला सभागृहाबाहेर आंदोलने करण्याची वेळ आली. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले तरच तोंड दाखवायला येण्याची सवय झालेले नेते, कार्यकर्ते आंदोलनातही दिसेनात. यासंदर्भात ‘राष्ट्रवादीत आलेली मरगळ जाईना’ या मथळ्याखाली ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच माजी आमदार विलास लांडे व स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. पालिकेत भाजपने भ्रष्टाचाराची सीमा गाठल्याचा आरोप करत असतानाच लांडे यांनी आमच्यातील त्यांच्याशी हातमिळवणी करणार्‍यांची पक्षश्रेष्ठी गय करणार नाहीत, असा इशारा दिला. विरोधी पक्षनेतेपद बहल यांच्याकडे वर्षभरासाठीच दिले असल्याचे सांगत त्यांनी बदलाचे संकेत दिले. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी नाना काटे व दत्ता साने यांच्यात स्पर्धा होती. चिंचवड हा भाजप शहराध्यक्ष आ. जगताप यांचा बालेकिल्ला असल्याने तेथे ताकद देण्यापेक्षा भोसरीचे गणित जुळवावे अशी अटकळ पक्षश्रेष्ठींनी बांधली. 

‘डॅमेज कंट्रोल’साठी साने यांना संधी

विधानसभेला भोसरीत अपक्ष महेश लांडगे यांच्या प्रचारात पुढे असलेल्या साने यांना संधी दिली तर डॅमेज कंट्रोल होईल, या बेरजेच्या राजकारणाकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. नाना काटे यांना त्यांची ‘मवाळ’ ही प्रतिमाही भोवली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला महापालिका सभागृहात कडवा विरोध करण्यासाठी आक्रमक चेहरा असलेल्या साने यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली. ते ही जबाबदारी किती समर्थपणे पेलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.