Mon, May 20, 2019 18:54होमपेज › Pune › सक्षम विरोधी पक्षनेत्यामुळे भाजपवर वचक

सक्षम विरोधी पक्षनेत्यामुळे भाजपवर वचक

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:15AMपिंपरी : योगेश बहल यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याजागी पक्षाने दत्ता साने या आक्रमक चेहर्‍यास संधी दिली. ही निवड सार्थ ठरविण्याचा व पदाला न्याय देण्याचा प्रयत्न साने करत असल्याने सत्ताधारी भाजपला बर्‍यापैकी वचक बसला आहे.

महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. भाजपने सत्ता संपादन केली. राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला. विरोधी पक्षनेतेपदी स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते, महापौर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद भूषविलेल्या योगेश बहल यांना संधी दिल्याने  या पदासाठी इच्छुक दत्ता साने यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी राजीनाम्याचा इशाराही दिला. नंतर हे वादळ शांत झाले. पण विरोधी पक्षनेत्यासाठी मोठे दालन द्यावे या मागणीसाठी संघर्ष करण्यात बहल यांचा वेळ वाया गेला. सभागृहात ते भाजपला पाहिजे तसा विरोध करत नाहीत अशा तक्रारी वाढल्या.

त्यामुळे राष्ट्रवादीला सभागृहाबाहेर आंदोलने करण्याची वेळ आली. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले तरच तोंड दाखवायला येण्याची सवय झालेले नेते, कार्यकर्ते आंदोलनातही दिसेनात त्यामुळे सभागृह व बाहेर दोन्हीकडे राष्ट्रवादीचे हसे होऊ लागले. याच दरम्यान माजी आमदार विलास लांडे यांनी विरोधी पक्षनेतेपद बहल यांच्याकडे वर्षभरासाठीच दिले असल्याचे सांगत बदलाचे संकेत दिले. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी नाना काटे व दत्ता साने यांच्यात स्पर्धा होती चिंचवड हा भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असल्याने तेथे ताकद देण्यापेक्षा भोसरीचे गणित पक्षश्रेष्ठींनी जुळवले  विधानसभेला भोसरीत अपक्ष महेश लांडगे यांच्या प्रचारात पुढे असलेल्या साने यांना संधी दिली तर डॅमेज कन्ट्रोल होईल. या बेरजेच्या राजकारणातून साने यांना संधी मिळाली. काटे यांची शांत प्रतिमाही त्यांना भोवली. हल्लाबोल आंदोलनाचा टेम्पो कायम ठेवण्यासाठी आक्रमक चेहर्‍याच्या साने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

आपली निवड सार्थ ठरविण्यासाठी साने हे पालिकेतील गैरकारभराबाबत सातत्याने आवाज उठवत आहेत. आषाढी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू न देता चांगल्या सुविधा देण्याची भूमिका भाजपने घेतली. तेव्हा दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याची परंपरा खंडीत करण्यास साने यांनी तीव्र विरोध दर्शवला. न्यायालयाचे आदेश आहेत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शाहू महाराज जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती यावर पालिका  कशी खर्च करते, असा बेधडक सवालही केला. 

गटनेत्यांच्या बैठकीच्या दिवशी चिखली, तळवडे, मोशी, भोसरी परिसरातील दिंडीप्रमुख, वारकरी यांना संघटित केले. टाळ कुटो आंदोलनाची तयारी केली. त्यामुळे भाजपला बॅकफूटवर जावे लागले. दिंडीप्रमुखांना भेटवस्तू म्हणून ताडपत्री किंवा तंबू देण्याची घोषणा महापौर नितीन काळजे यांनी गटनेत्यांच्या बैठकीनंतर केली. आयुक्त व प्रशासनास काही अडचण असेल तर नगरसेवकांच्या मानधनातून हा खर्च केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या निर्णयानुसार वारीतील दिंडीप्रमुखांना भेट म्हणून नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री दिली जाणार आहे. सत्ताधार्‍यांवर दबाव आणला तर विरोधी पक्ष त्यांना चुकीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू शकतो हे साने यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांचा हा उत्साह असाच कायम रहावा एवढीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.