होमपेज › Pune › विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीत उफाळणार वाद

विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीत उफाळणार वाद

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 11:58PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीत वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. प्रस्तावित पाणीपट्टीवाढीच्या विरोधात मंगळवारी (दि. 20) राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने या गटबाजीचे प्रदर्शन झाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काही नगरसेवक रिकामे तांबे डोक्यावर घेऊन आंदोलन करत होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेते योगेश बहल व राष्ट्रवादीच्या काही नगरसेविका  स्वपक्षीय आंदोलनाकडे पाठ फिरवीत याच विषयावरील शिवसेना-मनसेच्या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत होते. 

पालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले आणि भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून बहुमत मिळविले, तर राष्ट्रवादीला 36 जागा देऊन विरोधकांत बसण्याचा कौल जनतेने दिला. विरोधी पक्षनेतेपद स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते, महापौर, शहराध्यक्ष आदी पदे भूषविलेले योगेश बहल यांच्याकडे दिल्याने, या पदासाठी इच्छुक ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच त्याच व्यक्तींना पदे दिली जात असल्याने पक्षाचे नुकसान होत आहे, असे सांगत त्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला, नंतर मात्र हे वादळ शांत झाले. आता वर्षभराने पुन्हा याच विषयावरून पक्षातील वाद उफाळून आले आहेत.

‘राष्ट्रवादीत आलेली मरगळ जाईना’ या मथळ्याखाली ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केल्याने राष्ट्रवादी जागी झाली. माजी आमदार विलास लांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रधानमंत्री आवास योजना, समाविष्ट गावांसाठी 425 कोटींची कामे, कचरा गोळा करण्याच्या कामात लोच्या झाल्याचा आरोप केला. भाजपने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असा आरोप करत असतानाच,  आमच्यातील जे कोणी त्यांच्याशी आतून हातमिळवणी करत असतील त्यांची पक्षश्रेष्ठी गय करणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. विरोधी पक्षनेतेपद  योगेश बहल यांच्याकडे वर्षभरासाठीच दिले असल्याचे सांगत त्यांनी बदलाचे संकेत दिले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला बहल यांची असलेली अनुपस्थिती बरेच काही सांगून गेली होती.

मंगळवारी  प्रस्तावित पाणीपट्टीवाढीविरोधात झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील गटबाजीचे प्रदर्शन झाले. वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या काही पदाधिकारी, नगरसेवकांनी आंदोलन केले. या आंदोलनाकडे योगेश बहल समर्थकांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. हे नगरसेवक शिवसेना-मनसेच्या वतीने आयोजित आंदोलनात सहभागी झाले.  यामुळे पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली.