Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Pune › नव्या अभ्यासक्रमात ‘व्यक्‍त’ होण्याची संधी!

नव्या अभ्यासक्रमात ‘व्यक्‍त’ होण्याची संधी!

Published On: Jun 30 2018 1:44AM | Last Updated: Jun 30 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी 

यंदा इयत्ता पहिली, आठवी आणि दहावी या इयत्तांच्या पुस्तकांची मांडणी आणि रचनेबरोबरच अभ्यासक्रमात देखील आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यात कृतीशिक्षणावर भर देण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमात त्याला विषय किती समजला, यापेक्षा कसा समजला आणि समजलेले व्यक्त कसे करता येईल, याचा प्रामुख्याने विचार करण्यात आल्याची माहिती संबंधित विषयांच्या तज्ज्ञांनी दिली.

गणिताचे पुस्तक वाचनीय

गणित विषय समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या, गणित हा विषय विद्यार्थ्यांना कंटाळवाणा वाटतो. त्यामुळे गणित पुस्तक वाचनीय करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचावे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणित गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून शिकवण्यात येणार आहे. 

पर्यावरणीय साहित्याची मदत घेऊन विद्यार्थ्यांना पाढे, बेरीज, वजाबाकीचे धडे दिले जाणार आहेत. आठवीच्या विद्यार्थ्यांना गणिते चर्चेच्या माध्यमातून सोडवावी लागणार आहेत. यामध्ये जरा ‘आठवू या, जरा जाणून घेऊ या’ अशा कृतींच्या माध्यमातून त्यांच्यातील धीटपणा जागृत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जीएसटी, तारांकित प्रश्‍न, पर्यायी प्रश्‍न व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून गणित शिकवले जाणार आहे. पुस्तकातच प्रश्‍न आणि उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गाईडची आवश्यकता राहणार नाही.

हिंदी विषयाच्या विषय समितीच्या विशेष अधिकारी डॉ. अलका पोतदार म्हणाल्या, हिंदी माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना चित्रांच्या माध्यमातून भाषेची शिकवण देण्यात येणार आहे. यामध्ये वर्ण कसे तयार करायचे, चित्र आणि शब्दांची सांगड कशी घालायची, हे शिकविण्यात येईल. इयत्ता आठवीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही पहिल्यांदाच मुलगा आणि मुलगी दोघेही रांगोळी काढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील लिंगभेद दूर करण्याचा संदेश देण्यात आला आहे. पुस्तकात वेगवेगळे साहित्यप्रकार समाविष्ट करण्यावर भर दिला आहे. गित, निबंध, साक्षात्कार, एकांकिका, काव्य, दोहे, गझल, खंडकाव्य, महाकाव्य यांचा समावेश करण्यात आला आहे. इयत्ता दहावीच्या पुस्तकात स्वाध्याय, कृतीयुक्त प्रश्‍नपत्रिका, मूल्यमापन आराखडा, वेगवेगळे साहित्यप्रकार समाविष्ट केले आहेत.

इतिहासाची वर्तमानाशी सांगड

इतिहास,नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विषय समितीचे विशेष अधिकारी मोगल जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी माहिती देताना घडून गेलेला इतिहास आणि इतिहास लेखनातील त्याची मांडणी, यांच्यामधील वैचारिक दुवा आणि सैद्धांतिक दुवा, यांचे आकलन झाल्यानंतर इतिहासाच्या कालक्रमानुसार केल्या जाणार्‍या निवेदनात्मक मांडणीच्या पलीकडचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे इतिहासाची सांगड वर्तमानाशी आणि भविष्याशी घालता येण्याची बौद्धिक, भावनिक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. 

इतिहासामध्ये भारतीय भूमीत कला कौशल्ये, क्रीडा, मनोरंजन, स्थापत्य यांसारख्या क्षेत्रामध्ये कसा विकास होत गेला आणि त्यांचा आपल्या वर्तमान संस्कृतीशी अजूनही कसा संबंध आहे. हे वाचणे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. इयत्ता दहावीच्या राज्यशास्त्रात संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी, भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने, अशा महत्त्वाच्या घटकांचा समावेश केला आहे. अशा प्रकारे केलेल्या बदलामुळे विद्यार्थी अधिकाधिक व्यक्त होणार असल्याचे देखील संबंधित तज्ज्ञांनी सांगितले आहे.