होमपेज › Pune › कच्च्या साखर निर्यातीची संधी

कच्च्या साखर निर्यातीची संधी

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 1:05AMपुणे : किशोर बरकाले

केंद्र सरकारने सुमारे 20 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिलेली असून कारखान्यांनी ऑगस्ट महिनाअखेर त्यापैकी 4 लाख 90 हजार टनाइतकी साखर निर्यात पूर्ण केलेली आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 4 लाख टन साखर महाराष्ट्रातून निर्यात झालेली आहे. तर जागतिक बाजारात असलेल्या कच्च्या साखर निर्यातीमध्ये भारताला आघाडी घेण्याची संधी चालून आलेली आहे. कारण ब्राझिलने कच्च्या साखरेऐवजी तेथील उत्पादन इथेनॉलकडे वळविल्याचा फायदा घेता येणे शक्य आहे.

महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेशातून 55 हजार टन, कर्नाटक 19 हजार टन, गुजरातमधून 13 हजार टन व अन्य राज्यांतून मिळून 3 हजार टन अशी एकूण 4 लाख 90 हजार टन साखरेची निर्यात पूर्ण झालेली आहे. 

केंद्राने साखर निर्यातीस डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. केंद्राने साखर निर्यातीस परवानगी देताना उसाला प्रति टनास 55 रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यातून साखरेला प्रति क्विंटलला 777 रुपये उपलब्ध होतात, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. ते म्हणाले की, जागतिक बाजारात कच्च्या साखरेचा प्रति क्विंंटलचा भाव 1600 रुपये आहे. त्यामध्ये केंद्राचे 777 रुपयांचे अनुदान धरले तरी प्रत्यक्षात 2377 रुपये होतात. केंद्राने साखरेचा प्रति क्विंटलचा दर 2900 रुपये निर्धारित केलेला असल्याने प्रति क्विंटलला सुमारे 523 रुपयांचा तोटा कसा भरुन काढायचा, यासाठी महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत.    चालू आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये देशात 335 लाख टनाइतके विक्रमी साखर उत्पादन होण्याची अपेक्षा असून देशात ऑक्टोंबर महिन्यात आंरभीचा शिलकी साठा 100 लाख मे. टन आहे. 

म्हणजेच देशात एकूण उपलब्धता 435 लाख मे. टन होईल. देशांतर्गत साखरेचा वाढीव खप पाहता 260 लाख टन विक्री झाली तरी 175 लाख टन अतिरिक्त साखर शिल्लक राहील. त्यामुळे साखर निर्यातीशिवाय कारखान्यांना पर्याय नसल्याची स्थिती आहे.

“आखाती देशातील शारजा येथे साखरेच्या शुध्दीकरणाचे मोठे प्रकल्प असून ते दरवर्षी  ब्राझिलकडून कच्ची साखर आयात करीत असत. मात्र, ब्राझिलने कच्च्या साखरेऐवजी इथेनॉलकडे उत्पादन वळविल्याने शारजा येथे कच्च्या साखरेची निर्यातीची भारताला संधी आहे. शिवाय वाहतुकीचे अंतर कमी असल्याने ही निर्यात किफायतशीर राहील. त्यादृष्टिने कारखान्यांना कच्च्या साखर निर्यातीचे करार करण्यास कारखान्यांनी प्राधान्य दयावे. याशिवाय मलेशिया, इंडोनेशिया, बांग्लादेश, श्रीलंका, अफगणिस्तान, चीनमधून भारतीय कच्च्या साखरेला मागणी आहे. त्याचा फायदा कारखान्यांनी घेतल्यास सुमारे 70 लाख टन कच्च्या साखर निर्यातीची संधी भारताला आहे.    - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली.