होमपेज › Pune › खड्ड्यांवरून विरोधकांचे आंदोलन

खड्ड्यांवरून विरोधकांचे आंदोलन

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

सलग झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांचे पडसाद महापालिकेच्या मुख्य सभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलन करत पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मात्र,  सत्ताधारी नगरसेवकांनी या विषयावरून सावध व बचावात्मक पवित्रा घेतला. दरम्यान, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पालिकेच्या पथ विभागाने दिली. 

महापालिकेची मुख्य सभा गुरुवारी झाली. सभेच्या सुरुवातीलाच शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून विरोधकांनी आंदोलन सुरू केले. यावर बोलताना नाना भानगिरे म्हणाले, सोलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  अ‍ॅड. अविनाश साळवे म्हणाले, रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. यावर ठेस पर्याय शोधायला हवा. परदेशात जे तंत्रज्ञान वापरले जाते, ते आपण शहरातील रस्त्यांसाठी वापरणे गरजेचे आहे. आबा बागूल म्हणाले, रस्त्यांवर दर वर्षी पडणार्‍या खड्ड्यांवर कायमचा उपाय म्हणून या कामात प्लास्टिकचा वापर करण्यात यावा. बाळासाहेब ओसवाल यांनी बिबवेवाडी रस्त्याच्या दुरावस्थेची माहिती सभागृहास दिली. प्रकाश कदम म्हणाले, कोट्यवधींच्या खर्चानंतरही रस्त्यांवर खड्डे आहेत. या खड्ड्यांच्या संदर्भात उपाययोजना करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा. या कामामध्ये जे कोणी प्रशासनातील लोक दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करा. 

संजय भोसले म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती काळजी घेतल्यास रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत. कोट्यवधी रुपये खर्चूनही शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे कसे पडले आहेत, काम करणारे ठेकेदार आणि अधिकार्‍यांचे संगनमत असल्याने शहरात सर्वत्र खड्ड्यांची स्थिती आहे. गणपती, दिवाळीपूर्वी खड्डे बुजवून रस्ते व्यवस्थित होणे गरजेचे आहे. हे खड्डे आठवडाभरात खड्डे बुजले नाहीत, तर सर्वपक्षीय आंदोलन केले जाईल. 

विरोधीपक्ष नेते चेतन तुपे म्हणाले, शहरातील रस्त्यांवर खड्डे असताना सत्ताधार्‍यांमधील एकही नगरसेवक यावर बोलत नाहीत. सत्ताधार्‍यांच्या प्रभागातील रस्त्यावर खड्डे नाहीत का, मग विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील रस्त्यांवरच खड्डे कसे आहेत. सिमेंटचे रस्ते रातोरात खोदून केबल टाकल्या जात आहे. त्याची माहिती पालिका प्रशासनाला कळत नाही. तुपे यांच्या वक्तव्यावर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. महापौरांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. आज शहरात खड्डे आहेत, ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. प्रशासनाने चांगले तंत्रज्ञान वापरून दर्जेदार काम करावे, असेही डॉ. धेंडे म्हणाले.  

सभागृह नेते भिमाले म्हणाले, लोकप्रतिनिधींनी रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष घालणे गरजेचे आहे.  सलग दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रशासनातील अधिकार्‍यांनी पहाणी करून नागरिकांचा त्रास कमी करावा. खुलासा  करताना पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, नागरिकांची असुविधा टाळण्यासाठी जानेवारी ते जूनदरम्यान कामे हाती घेतली आहेत. पथ विभागाकडून 12 मीटरच्या पुढील कामे केली जातात. तर त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची कामे संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून केली जातात. मेट्रोला लेखी पत्रासह तोंडी सूचना दिल्या आहेत. मात्र मेट्रोची वाट न पाहता खड्डे बुजविण्याचे काम पथ विभाग हाती घेतले जाणार आहे. समाविष्ट गावांमधील रस्त्यांची आवस्था आपल्याकडे येण्यापूर्वीच भयानक होती. ते रस्ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. 

खड्डे न बुजविल्यास मेट्रोचे काम बंद पाडू 

मेट्रोचा कामामुळे कोथरूड भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामेट्रो खड्ड्यांची दुरुस्ती करणार की, महापालिका याच्याशी नागरिकांना देणे घेणे नाही. आठवड्यात खड्डे न बुजविल्यास शिवसेना खड्डे बुजवेल अणि मेट्रोचे काम बंद पाडेल, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी सभागृहात दिला.