होमपेज › Pune › ‘ओफो’च्या सायकली विद्यापीठातून गायब...

‘ओफो’च्या सायकली विद्यापीठातून गायब...

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 12:53AMपुणे : लक्ष्मण खोत 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या ‘सायकल शेअरिंग’ योजनेला विद्यार्थ्यांसह कर्मचार्‍यांनी हरताळ फासला आहे. ‘सायकल शेअरिंग’अंतर्गत दुसर्‍या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या ओफो कंपनीच्या सायकलींमधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेत, सायकलींचा वापर विद्यार्थ्यांना एकट्यालाच करता यावा, यासाठी सायकल लपवणे, दुसरे लॉक लावणे असे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे ओफो कंपनीच्या सायकली पुन्हा एकदा परिसरातून गायब झाल्या असून, इतरांना सायकल मिळणे दुर्मिळ झाले आहे. 

पुणे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी विद्यापीठात ‘सायकल शेअरिंग’ योजना सुरू करण्यात आली. सायकलींचे शहर ही ओळख पुन्हा प्राप्त करण्यासाठी, पुणे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला ‘झुमकार पेडल’च्या सहकार्याने दि. 5 डिसेंबर रोजी पुणे विद्यापीठात 100 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या. या योजनेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे स्मार्ट सिटी कंपनीद्वारे विद्यापीठात ओफो कंपनीमार्फत आणखी 275 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या. झुमकार कंपनीच्या सायकलींना नाममात्र शुल्क आकारले जात असून, ओफो कंपनीद्वारे दिलेल्या सायकली तीन महिने मोफत दिल्या आहेत. झुमकार पेडेल कंपनीच्या सायकलींची सुरक्षा व्यवस्था तगडी असल्याने या सायकली सुरक्षित राहिल्या; मात्र, ओफो कंपनीच्या सायकलींमधील सुरक्षा व्यवस्थेत असणार्‍या त्रुटींमुळे सायकली मोठ्या प्रमाणावर गायब झाल्या आहेत. 

विद्यापीठात विद्यार्थ्यांसह कर्मचार्‍यांनी ओफो कंपनीच्या सायकलींचा वापर खासगी मालमत्तेसारखा सुरू केला आहे. त्यामुळे ओफो कंपनीच्या सायकली विद्यापीठ परिसरात दिसेनाशा झाल्या आहेत. सायकल शेअरिंग योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सायकल स्टॅण्डवर ओफो कंपनीच्या सायकलच दिसत नाहीत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह कर्मचार्‍यांनी या सायकलींच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी हेरून आणि मोफत उपलब्ध होत असल्याने या सायकलींचा वापर खासगी मालमत्तेसारखा सुरू केला आहे. 

सायकलींना जीपीएस यंत्रणा नसल्याने विद्यापीठ प्रशासनाला या सायकली ट्रेस करणे अवघड जात आहे. त्यामुळे खरोखरच गरजू असणार्‍या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, अद्ययावत सुरक्षा व्यवस्था असलेल्या सायकली उपलब्ध कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.